तुम्हाला माहिती आहे का मंगळसूत्राची सुरुवात कुठून झाली?

Mangalsutra । मंगळसूत्र हा शब्द दोन शब्द एकत्र करून तयार झालेला आहे. मंगळ म्हणजेच मंगल किंवा पवित्र आणि सूत्र म्हणजेच दोरा किंवा धागा. समाजात विवाहाला मान्यता म्हणूनही मंगळसूत्राकडे पाहिले जाते. मंगळसूत्राचे जे आजचे रूप आहे तसे सुरुवातीच्या काळात नव्हते. अथर्ववेदानुसार वधूला केवळ दागदागिन्यांनी नटवण्याची पद्धत होती. कारण दागदागिने हे शुभ मानले जातात.
तमिळ भाषेतील प्राचीन साहित्यात नमूद केल्यानुसार मंगळसूत्राचा उल्लेख इसवी सन पूर्व 300 सालात मिळतो. त्या काळात वर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधत असे. मंगळसूत्राला थाली किंवा मंगलयम असे म्हटले जात असे.
मंगळसूत्र कुठून आले?
अनेक प्रकारच्या साहित्यात आणि अहवालात असे म्हटले आहे, की मंगळसूत्राची सुरुवात दक्षिण भारतातील तमिळनाडूत झाली आणि हळूहळू ही प्रथा उत्तर भारतात पोचली. जी वैवाहिक जीवनाची प्रतीक बनली. द हिंदू वर्तमानपत्रातील माहितीनुसार तमिळ साहित्यामध्ये मंगळसूत्राला विवाहाचे प्रतीक मानले जात असे.
महाकाव्य सिलाप्पाधिकरम मध्ये कोवलन आणि कन्नगी यांच्या विवाहाचे वर्णन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये या स्वयंवरात थाली बांधण्यात आली असल्याचे म्हटले आहे. त्या काळात मंगळसूत्र हे काळ्या मण्यांच्या स्वरूपात नसायचे. दोऱ्याला हळदीच्या पाण्यात बुडवून पिवळा रंग दिला जायचा आणि मग वर ते वधूच्या गळ्यात घालत असे. सध्या अशी प्रथा गोंड आणि मुंडा या आदिवासी जमातींमध्ये प्रचलित आहे. सध्या या जातींमध्ये देखील वधूला वृक्षाच्या पानांचे हार घातले जातात.
ऐतिहासिक दृष्टीने पाहिले तर भारतात दागिने हे वैवाहिक जीवनात शुभचिन्ह मानले जात असत. स्त्रीला वैधव्य आले किंवा तिने संसारातील मोहमायेचा त्याग केला तरच तिच्या अंगावरील दागिने उतरवले जात असत. या पुस्तकात अथर्ववेदातील गोष्टींबाबतही लिहिण्यात आलेले आहे. त्यानुसार लग्न समारंभात वधुपिता जेव्हा म्हणतो की सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेली मुलगी मी तुला देत आहे तेव्हाच विवाह समारंभ पूर्ण होतो.
काळानुरूप मंगळसूत्राचे स्वरूप आणि त्याचे डिझाईन वेगवेगळ्या जाती आणि जमातींमध्ये बदलत गेले आणि मग पिवळ्या धाग्याच्या जागी काळे मणी आणि सोन्याच्या मणी आले. मात्र मंगळसूत्राला देशभर मान्यता आहे असे म्हटले जाते की काळे मणी हे भगवान शिवाचे रूप आहे आणि सोन्याचा संबंध देवी पार्वतीशी जोडला जातो त्यामुळेच मंगळसूत्रांमध्ये काळेमणी आणि सोन्याचे मणी घातले जातात.





