Smoky paan। द्रवरूप नायट्रोजनमध्ये स्टोअर केलेले पान खाण्याचा देखील ट्रेंड सध्या अतिशय लोकप्रिय आहे. लहान मुले देखील कुठलीही नवी गोष्ट पाहिली की ती करण्यासाठी उत्सुक असतात. बाजारात मिळणारी प्रत्येक वस्तू ही आपल्या आरोग्यासाठी चांगली असेलच असे नाही आणि मुलांसाठी तर अनेकदा अशा गोष्टी हानिकारकच असतात. अनेकदा पालकांकडून याकडे दुर्लक्ष होते. बंगलोर मध्ये देखील अशीच घटना घडली. बारा वर्षाच्या एका मुलीने स्मोकी पान खाल्ल्यानंतर तिला जे सहन करावे लागले ते ऐकल्यानंतर तुम्ही कधीही अशा स्मुकी गोष्टी खाणार नाहीत. बंगळूर मधील एका छोट्या मुलीने द्रवरूप नायट्रोजन असलेले स्मोकी पान खाल्ल्यानंतर तिच्या पोटात आग होऊ लागली आणि मग तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिच्या पोटामध्ये छिद्र तयार झाल्याचे दिसून आले. मग डॉक्टरांना तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. सहा दिवसानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. या संदर्भात माध्यमांना माहिती देताना ती मुलगी म्हणाली की तिचे कुटुंब एका लग्नसमारंभात गेले होते त्या ठिकाणी अनेक लोक स्मोकी पान खाताना दिसत होते. सगळ्यांना पान खाताना पाहून आपणही स्मोकी पान खावे अशी तिची इच्छा झाली. तिने द्रवरूप नायट्रोजन असणारे असे स्मोकी पान खाल्ल्यानंतर लगेचच तिच्या पोटामध्ये असह्य वेदना सुरू झाल्या. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिथे असे निदान झाले की स्मोकी पान खाल्ल्यामुळे तिच्या पोटात छिद्र तयार झाले होते. त्यामुळे तिला असह्य वेदना होत होत्या. पॅकिंग केलेल्या खाद्यपदार्थांच्या दर्जा आणि टिकाऊपणा वाढवण्यासाठी लंडनमधील एका कंपनीने द्रवरूप नायट्रोजन चा वापर करण्यास सुरुवात केली होती. अशा प्रकारे द्रवरूप नायट्रोजनच्या मदतीने कॉफी, बटाट्याचे चिप्स, शेंगदाणे, पीनट बटर अशा अनेक पदार्थांना कित्येक महिने ताजे ठेवले जाते. त्याचप्रमाणे सध्या अनेक रेस्टॉरंट मध्ये ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी पदार्थांमध्ये द्रवरूप नायट्रोजनचा वापर करून खाद्यपदार्थांची डिश अतिशय आकर्षक स्वरूपात सजवून त्यामध्ये धूर येत असल्याचे दाखवत ग्राहकाच्या टेबलवर आणून दिली जाते. मात्र अशा प्रकारची डिश ही जितकी फॅन्सी दिसते प्रत्यक्षात तितकीच पोटासाठी नुकसानकारक असते.