कुछ नया “कोरोना”! (बोला बिनधास्त)

या कोरोनाच्या संकटाने आपल्या सगळ्यांचीच आयुष्य मंदावली आहेत. ऑफिस बंद, शाळा, कॉलेज बंद, काम बंद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेर फिरणे बंद. हे आपल्यापैकी बर्याच जणांना अवघड जात असणार हे नक्की! पण तरीही आपली आणि समाजातल्या इतरांची काळजी म्हणून आपण घरात थांबलो आहोत.
पण घरात थांबून करायचं तरी काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. मलाही पडला होता पण या प्रश्नाचं उत्तर मी स्वतःच मिळवलं. अशी सुट्टी, अशी संधी आपल्याला परत कधी मिळेल माहित नाही. त्यामुळे या सुट्टीत मी ठरवलं की आपल्या सर्वात लाडक्या मित्राला समजून घ्यायचं. लक्षात आला का हा मित्र? हा मित्र म्हणजे तंत्रज्ञान. आपल्या रोजच्या जीवनात आपण तंत्रज्ञानाचा वापर करतोच. पण त्याच्या जरा पुढे जाऊन या सुट्टीत तंत्रज्ञान समजून घ्यायचं मी ठरवलं आणि याची प्रेरणा मिळाली आमच्या कॉलेजच्या प्रॉफेसर्सकडून!
ही अनिश्चित काळासाठीची सुट्टी मिळाली म्हटल्यावर मला वाटलं आता नो कॉलेज, नो अभ्यास, नो असाईनमेंट्स! पण आमच्या प्रॉफेसर्सनी आमची प्रेसेंटेशन्स आणि लेक्चर्ससुद्धा चक्क झूम व्हीडिओ कॉलवरून घेतली. त्यावेळी मात्र माझी जरा फजितीच झाली. हे झूम अॅप काय आहे, ते कसं वापरायचं, व्हीडिओ कॉल कसा करायचा, कुठली लिंक कशी उघडायची हे मला कळतच नव्हतं. शेवटी येनकेनप्रकारेन मी त्यात सहभागी झाले. पण फजिती झाल्याबद्दल मात्र वाईट वाटले. पण त्यानंतर दोनच दिवसात मी हे तंत्रज्ञान शिकून घेतलं आणि यशस्वीपणे पुढचे लेक्चर्स केले.
एवढंच नाही, तर हे तंत्रज्ञान मी माझ्या घरच्यांनाही शिकवलं. आता तेही व्यवस्थितपणे हे व्हिडिओ कॉल्सचं तंत्र हाताळू शकतात. अशा रितीने मी कोरोनाचा अर्थ “कुछ मत कोरोना” असा घेण्यापेक्षा “कुछ नया कोरोना” असा घेतला. पण मी एवढ्यावरच थांबणार नाही बरं का! अजूनही भरपूर वेगळं करणार आहे. माझ्या क्षमता तपासणार आहे. तुम्हीही या सुट्टीच्या काळात खूप काही करून घ्या. बाहेर पडून कोरोना पॉसिटिव्ह होण्यापेक्षा कोरोनाच्या सुट्टीला पॉसिटिव्हली घेऊया. घरी राहू, सुरक्षित राहू आणि कोरोनासोबतच आपल्यातल्या अज्ञानाला, नकारात्मकतेलाही हरवूयात आणि कोरोनानंतरचं आयुष्य नव्या जोमाने जगूयात!
– वैष्णवी सविता सुनील
कॉलेज रिपोर्टर,
संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ





