ठेकेदारांच्या भरवश्यावर पाणी योजनांची कामे करू नकाः मंत्री विखे

राहाता – जलजीवन मिशन अंतर्गत गावोगावी सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांवर लोकांचा अधिकार आहे. या योजनेच्या कामाची पूर्तता करताना नागरीकांना विश्वासात घ्या, ग्रामस्थांच्या सुचनांप्रमाणे योजनेच्या आराखड्यात पुन्हा बदल करा. योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाऱ्यांनी सुध्दा जबाबदारीने काम करावे, केवळ ठेकेदारांच्या भरवश्यावर योजनेची अंमलबजावणी करु नका आणि जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी अचानक भेटी देवून वस्तुस्थिती पाहावी अशा स्पष्ट सुचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
राहाता, श्रीरामपूर, संगमनेर आणि राहुरी तालुक्यात सुरु असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. यावेळी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सोनवणे, प्रांताधिकारी, तहसिलदार आणि संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या योजनेच्या अंमलबजावणीबाबत असलेल्या तक्रारी जाणून घेत मंत्री विखे यांनी संबधित अधिकाऱ्यांना त्या तातडीने सोडवणूक करण्याबाबत आदेश दिले. बहुतांशी गावांमध्ये ग्रामस्थांना विश्वासात न घेता योजनेचे काम सुरु असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या ही अतिशय गंभीर बाब असून, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. योजनेची अंमलबजावणी करताना अनेक गावांमध्ये ग्रामसभा झाल्या नाहीत, काही गावांमध्ये ग्रामसभेत केलेल्या ठरावानुसार योजनेत कोणताही अंतर्भाव झालेला नाही. त्यामध्ये बदल करुन, अधिकाऱ्यांनी पुन्हा ग्रामस्थांच्या मागणीनुसार या योजनांची आराखडे तयार करावेत. मागणीप्रमाणे योजनेचा वाढीव प्रस्ताव असेल तर पुन्हा मंजुरीसाठी पाठवा अशा सुचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
योजनेमध्ये वापरण्यात येणाऱ्या पाईपबाबतही या बैठकीत तक्रारी करण्यात आल्या.एका ठरावीक कंपनीचेच पाईप वापरावे अशी सक्ती योजनेत कुठेही नाही असे स्पष्ट करुन, त्यांनी सांगितले की, योजनेच्या बाबतीत कुठलाही निर्णय करताना अधिकारी आणि कंत्राटदारांनी ग्रामस्थांना विश्वासात घेवूनच करावा. सर्व योजनेच्या अंमलबजावणीसाठी पंचायत समिती आणि जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित समन्वय ठेवावा.या योजनेच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कामे सुरु असलेल्या गावांमध्ये अचानक भेटी देवून कामांचा आढावा घ्यावा,अशा सुचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत.





