पुणे | मुख्य आरोपीची डीएनए चाचणी करणार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी शोएब अख्तर उर्फ शोएब बाबू शेख याची डीएनए चाचणी केली जाणार आहे. या प्रकरणातील आरोपी घटनास्थळी थुंकले होते. आरोपी शेख याचे रक्त, नखे तसेच थुंकीचे नमुने न्याय वैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
शेख याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. कुलकर्णी यांनी २२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार गुन्हा प्रकरणी पसार झालेल्या शेख याला गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील प्रयागराज परिसरातून ताब्यात घेतले. त्याचा साथीदार चंद्रकुमार रवीप्रसाद कनाेजिया (वय २०, रा. उंड्री, कोंढवा) याला यापूर्वी अटक करण्यात आली आहे.
पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्याची रवानगी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शेख असून त्याच्याविरुद्ध बलात्कारासह लुटमारीचा गुन्हा भिगवण पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.
शेख, कनोजिया आणि साथीदारांनी केलेले कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे आहे. आरोपींकडून कोयता तसेच ऐवज जप्त करायचा आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपींनी वापरलेली दुचाकी जप्त करायची आहे.
गु्न्हा केल्यानंतर शेख हा पसार झाला होता. या काळात त्याला कोणी आश्रय दिला, याचा तपास करायचा आहे. आरोपींच्या लैंगिक सक्षमतेची चाचणी (पोटेन्सी टेस्ट) करायची असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे यांनी युक्तिवादात केली. न्यायालायने युक्तिवाद ग्राह्य धरून शेख याला २२ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलीस निरीक्षक युवराज हांडे तपास करीत आहेत.





