‘हा संविधानाच्या संरचनेवरील हल्ला’, वक्फ विधेयकावरून ‘या’ मुख्यमंत्र्यांची भाजपवर टीका, सर्वोच्च न्यायालयात देणार आव्हान

चेन्नई- वक्फ दुरुस्ती विधेयक घटनादुरुस्ती स्वीकारणे हा संविधानाच्या संरचनेवरील हल्ला आहे, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्याच्या निषेधार्थ स्टॅलिन काळी पट्टी बांधून विधानसभेत गेले होते.
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सभागृहात सांगितले की, वक्फ दुरुस्ती विधेयक हे धार्मिक सलोखा बिघडवणारे कृत्य आहे. हे अधोरेखित करण्यासाठीच, आम्ही आज (3 एप्रिल) काळी पट्टी बांधून विधानसभेच्या कामकाजात सहभागी झालो आहोत. द्रविड मुन्नेत्र कळघमच्या वतीने (डीएमके) या वादग्रस्त दुरुस्ती विधेयकाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
वक्फ बोर्डाचे स्वातंत्र्य नष्ट करणाऱ्या आणि अल्पसंख्याक मुस्लिम लोकसंख्येला धोका निर्माण करणाऱ्या केंद्र सरकारच्या या कायद्याविरुद्ध तामिळनाडू लढेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
वक्फ दुरुस्ती विधेयकाचा परिणाम अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर होणार असल्याने राज्य विधानसभेने 27 मार्च रोजी या प्रस्तावित दुरुस्तीविरुद्ध ठराव मंजूर केला होता. याचा भारतातील धार्मिक सलोख्यावर गंभीर परिणाम होईल. लोकसभेत केवळ 288 सदस्यांनी त्याच्या बाजूने मतदान केले. 232 खासदारांनी विरोधात मतदान करूनही वक्फ कायद्यातील दुरुस्ती मंजूर होणे अत्यंत निषेधार्ह आहे. ही साधारण संख्या नाही, ही संख्या वाढूही शकते, असे त्यांनी सांगितले.





