चेन्नाई – तामिळनाडु विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील अभिभाषणाच्यावेळी द्रमुक सदस्यांनी थेट राज्यपालांशीच हुज्जत घातल्याचा प्रकार आज घडला. राज्याशी संबंधीत विषय आम्हाला तुमच्या समोर सरकारकडे उपस्थित करायचे आहेत असे सांगून त्यांनी वाद घालायला सुरूवात केली. त्यावेळी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना रोखण्याचा प्रकार घडला. राज्यपालांचे अभिभाषण सुरू होण्याच्या आधीच द्रमुकचे सदस्य उठून उभे राहिले आणि त्यांनी काही विषय उपस्थित केले. त्यात द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन हे आघाडीवर होते. राज्यपालांनी स्टॅलिन यांना रोखण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात तामीळनाडुसाठी एक लाख तीन हजार कोटी रूपयांची तरतूद केल्याची माहिती देण्याचा प्रयत्न राज्यपालांनी करताच द्रमुकचे अन्यही सदस्य उठून उभे राहीले आणि त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला. राज्यपालांनी आपले अभिभाषण करावे आणि अन्य राजकीय कॉमेट्स करू नयेत अशी सूचना द्रमुक सदस्यांनी त्यांना केली. त्यानंतरही हा थेट वादविवाद सुरूच राहिला. काही वेळानंतर राज्यपालांनी आपले अभिभाषण सुरू केल्यानंतर द्रमुक सदस्यांनी सभात्याग केला.