दिवाळी होणार गोड ! लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती

Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्ताची महिलांना प्रतीक्षा होती. त्याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. योजनेतील पात्र महिलांच्या खात्यात आजपासून १५०० रूपये येण्यास सुरूवात होणार आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.
पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील पात्र लाडकीच्या खात्यात सन्मान निधी वर्ग केला जाईल, असे तटकरेंनी सांगितले आहे. याशिवाय सर्व लाभार्थी महिलांनी दोन महिन्यांच्या कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया देखील पूर्ण करुन घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित… pic.twitter.com/6e3CgboGVL
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) October 9, 2025
अदिती तटकरेंचे ट्वीट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील २ महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती,’ असे आदिती तटकरे यांनी म्हंटले आहे.
ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण कराल?
- ladkibahin.maharashtra.gov.in या पोर्टलला भेट द्या. लॉगिन केल्यावर ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याविषयीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक नोंदवा.
- त्यानंतर कॅप्चा कोड तिथे नोंदवा.
- आधार प्रमाणिकरणासाठी मंजूरी द्या. Send OTP या पर्यायावर क्लिक करा.
- आधारशी लिंक मोबाईलवर आलेला OTP टाका आणि Submit करा.
- त्यानंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक, कॅप्चा आणि OTP नमूद करा.
- लाभार्थी लाडकी बहिणीचा जात प्रवर्ग निवडा आणि आवश्यक प्रमाणपत्रांची पुष्टी करा.
- सर्व माहिती तपासून Submit बटणावर क्लिक करा.
- eKYC पडताळणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असा संदेश स्क्रीनवर दिसेल.
हेही वाचा:
Satara: सातारा जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी सेवक पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत





