Diwali shopping: लखलख रोषणाईसाठी बाजारपेठेत गर्दी!
Diwali shopping: Crowds in the markets for dazzling festive lights!

विद्युत, एलईडी, पिक्सेल आणि वॉटरप्रूफ माळांचे विविध पर्याय बाजारात
Diwali shopping : दिवाळीत घरांची सजावट, रोषणाई करण्यासाठी इलेक्ट्रिकल बाजारपेठांमध्ये विद्युत माळांना मागणी वाढली आहे. घराच्या दर्शनी भागापासून बाल्कनी, खिडक्या, दरवाजे आणि इमारतींच्या सजावटीसाठी नागरिक विविध प्रकारच्या आकर्षक विद्युत माळांची खरेदी करत आहेत.
यंदा बाजारात पारंपरिक विद्युत माळांसह एलईडी, पिक्सेल आणि वॉटरप्रूफ माळांचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, स्वदेशी बनावटीच्या तसेच दुरुस्ती करता येणाऱ्या माळांनाही नागरिकांची पसंती मिळत आहे.
दिवाळी हा तर प्रकाशाचा सण आहे. प्रकाशाचा अंधारावरील विजय साजरा करताना घर, परिसर रोषणाईने उजळवण्याची परंपरा आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीमध्ये विद्युत माळांना महत्त्वाचे स्थान असते. नागरिक प्रकाशाचा उत्सव साजरा करण्यासाठी दिवे, पणत्या आणि कंदिलांसह विद्युत माळांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.
ग्राहकांना घरांना प्रकाशित करण्यासाठी बाजारात ३० फुटांपासून ते १५० फुटांपर्यंतच्या माळा उपलब्ध आहेत. त्यामध्ये विविध रंग, आकार आणि आकर्षक डिझाइनच्या माळांचा समावेश आहे.
ग्राहकांच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार विक्रेत्यांकडून माळांचे पर्याय सुचवले जात आहेत. कमी किमतीतील माळांपासून ते अधिक टिकाऊ आणि वॉटरप्रूफ माळांपर्यंत अनेक पर्याय असल्याने निवड करणे सोपे झाले आहे.
यंदा भारतीय बनावटीच्या आणि दुरुस्त करता येणाऱ्या विद्युत माळांकडे ग्राहकांचा कल असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. काही ग्राहक कमी किमतीतील एकदा वापरून खराब झाल्यास बदलता येणाऱ्या माळांना पसंती देतात.
काही ग्राहक अधिक पैसे खर्च करून दीर्घकाळ वापरता येणाऱ्या आणि दुरुस्तीची सुविधा असलेल्या माळांची खरेदी करतात. मंदिर, मंडप तसेच इतर कायमस्वरूपी रोषणाईसाठी दुरुस्ती करता येणाऱ्या माळांना विशेष पसंती मिळते.
भारतीय बनावटीच्या माळांची किंमत अद्यापही चिनी माळांच्या तुलनेत अधिक असली तरी काही ग्राहक ती किंमत मोजण्यास तयार असल्याचे दिसते. त्यामुळे पारंपारिक सण साजरे करताना देशहिताची जाणीवही नागरिक ग्राहक ठेवताना दिसत आहेत. ग्राहकांच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार ६० रुपयांपासून ते ४०० रुपयांपर्यंत विविध पर्याय आहेत.
दिवाळी जवळ आल्याने बाजारात ग्राहकांची गर्दी वाढत असून खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवाळीला अजून काही दिवस शिल्लक असल्यामुळे येत्या काही दिवसात हा प्रतिसाद वाढण्याची चिन्हे आहेत. ग्राहकाच्या गरजा आणि आवडीनुसार बाजारात खूप पर्याय उपलब्ध आहेत.
– महेंद्रसिंह राठोड, महेंद्र इलेक्ट्रिकल्स
ग्राहकांकडून फॅन्सी प्रकारच्या विद्युत माळांना अधिक पसंती दिली जात आहे. बाजारात भारतीय बनावटीच्या दुरुस्ती करता येणाऱ्या माळांपासून ते चिनी बनावटीच्या विविध लांबीच्या माळा उपलब्ध आहेत. योग्य किमतीत चांगले पर्याय बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
– जसवंत सिंग, राजधानी इलेक्ट्रिकल्स





