अंधारात दिवाळी! ओमराजे निंबाळकर संतापले: म्हणाले – ‘सरकारने दिवाळी पुढे ढकलावी’

सोलापूर: सीना नदीला पूर येऊन महिना उलटला, तरी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे-पाथरीसह परिसरातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा अजूनही पूर्णपणे सुरळीत झालेला नाही. पुनर्वसनाच्या कामातील दिरंगाईमुळे शेतकरी कुटुंब आजही अंधारात असून, जनरेटरच्या उजेडात दिवाळी साजरी करण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली आहे.
पूर ओसरल्यानंतर सरकारने तातडीची मदत म्हणून प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला जाहीर केलेली ₹१०,००० ची आर्थिक मदत काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असली, तरी ती रक्कम जनरेटरचे भाडे आणि डिझेलच्या खर्चातच संपल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेक कुटुंबे आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांच्या घरात अंधार असून, जनावरांसाठी चारा मिळवणेही एक आव्हान बनले आहे.
या गंभीर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “सरकारने दिवाळीपूर्वी मदत मिळेल असे सांगितले, पण आजही लोक अंधारात आहेत, वीज नाही, सण नाही. सरकारने वास्तव बघावे आणि शक्य असेल तर दिवाळीच काही दिवस पुढे ढकलावी,” असे संतापजनक वक्तव्य त्यांनी केले.
स्थानिक प्रशासनाने पूरस्थितीमुळे वीज खांब व ट्रान्सफॉर्मरचे मोठे नुकसान झाल्याचे कारण दिले आहे, तर पूरग्रस्त ग्रामस्थ “दोन दिवसात वीज येईल” हा शब्द गेल्या महिन्यापासून ऐकत असल्याची खंत व्यक्त करत आहेत. पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला असून, सरकारने वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करावा आणि मदत तातडीने वितरित करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सरकारच्या घोषणा आणि जमिनीवरील वास्तव यातील मोठी दरी जनरेटरच्या प्रकाशातील दिवाळीतून स्पष्ट दिसत आहे.





