रिटेलर खुश! दिवाळीत 1.25 लाख कोटी रुपयांची खरेदी, दहा वर्षाचा विक्रम मोडला

मुंबई – दिवाळीत भारतातील ग्राहकांनी जोरदार खरेदी करून उत्सव साजरा केला. ग्राहकांनी किमान 1.25 लाख कोटी रुपयांची खरेदी केली असल्याचे व्यापाऱ्यांच्या संघटनेने म्हटले आहे. ग्राहकांनी या दिवाळीत जोरदार खरेदी करीत केल्यामुळे हस्तकला कारागीर, ट्रेडर, आकाश कंदील बनवणारे कारागीर, मेणबत्त्या तयार करणारे कारागीर यांना भरपूर नफा झाला असल्याचे कॉन्फडरेशन ऑफ इंडियन ट्रेडर्स असोशिएशन या संघटनेने म्हटले आहे.
या दिवाळीत तब्बल 9 हजार कोटी रुपयांचे दागिने खरेदी केले गेले. तर 15 हजार कोटी रुपयांचे पॅकेजींग मटेरियल खरेदी केले. याचा अर्थ नागरिकांनी एकमेकांना भरपूर भेटी दिल्या आहेत. या संघटनेत 60 लाख व्यापारी आहेत. देशभरातील मोठ्या 20 शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन ही आकडेवारी तयार करण्यात आली आहे. ज्या शहरातील माहिती घेण्यात आली त्यामध्ये दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, लखनऊ, पुणे, कोलकत्ता, हैदराबाद, चेन्नई, बंगलोर, भोपाळ, पाटणा, चंदिगड, नागपूर इत्यादी शहराचा समावेश आहे.
चिनी वस्तूवर बहिष्कार
व्यापाऱ्यांच्या संघटनेने गेल्या अनेक वर्षापासून भारतातील नागरिकांना चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. या वस्तू दर्जेदार नसतात, त्याचबरोबर त्यांच्या किमती कृत्रिमरीत्या कमी केलेल्या असतात. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे आणि उत्पादकांचे नुकसान होते असे या संघटनेने म्हटले आहे. यावर्षी भारतीय नागरिकांनी स्वदेशी वस्तू खरेदी केल्या. त्यामुळे चिनी व्यापाऱ्यांचे 50 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा दावा या संघटनेने केला आहे.





