Diwali Exhibition: दिवाळी फराळ, हस्तकला अन् घर सजावटीच्या वस्तू! ‘वनिता समाज’च्या प्रदर्शनाला पुणेकरांची गर्दी…
Diwali Exhibition : प्रदर्शन एकाच दिवसासाठी असून, आजच सायंकाळी ७ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार

पुणे: येत्या काही दिवसांवर दिवाळी सण आला असून नागरिकांचीही खरेदीसाठी रेलचेल सुरू झाली आहे. याचकरिता आता पुण्यातील टिळक स्त्यावरील महाराष्ट्रीय मंडळासमोर ‘वनिता समाज संस्थेतर्फे’ दिवाळी वस्तू आणि खाद्यपदार्थ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन ‘दैनिक प्रभात’चे कार्यकारी संपादक अविनाश भट, सरव्यवस्थापक रविकुमार इंडी आणि संस्थेच्या अध्यक्षा अस्मिता रावेतकर यांच्या हस्ते पार पडले. या वेळी संस्थेच्या विश्वस्त वृषाली लिमये, खजिनदार कांचन खळदकर, सचिव ॲड. मृदुला सहस्रबुद्धे, अश्निनी पांडे आणि आणि कार्यकारिणी सदस्य माधुरी परांजपे उपस्थित होत्या.
या प्रदर्शनात एकूण २० स्टॉल उभारण्यात आले असून, अस्सल पारंपरिक चवीचा घरगुती ‘दिवाळी फराळ’ हे येथील मुख्य आकर्षण ठरत आहे. महिला बचत गट आणि स्थानिक कारागिरांच्या हस्तकला व घरसजावटीच्या वस्तूंना चांगली मागणी असून त्याद्वारे विविध वस्तू येथे ठेवण्यात आले आहेत.
पुणेकरांचा मोठा प्रतिसाद
जसे की, लाडू, चिवडा, चकली, अनारसे आणि शंकरपाळी खरेदीसाठी महिलांची विशेष पसंती मिळत आहे. फराळासोबतच आकर्षक पणत्या, सुवासिक अगरबत्ती, उटणे, आकाशकंदील व रांगोळीचे साहित्य उपलब्ध आहे. या प्रदर्शनाला पुणेकरांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे.
‘कमवा व शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू
विशेष म्हणजे, विद्यार्थी सहाय्यता समितीच्या ‘कमवा व शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांनी बनविलेले आकाशकंदील, उटणे आणि मेणबत्त्या प्रदर्शनात आहेत. तसेच, ‘वंचित विकास’ संस्था आणि राष्ट्रीय दृष्हीहीन संघटना विभागीय संघांचा दिवाळी फराळाचा स्टॉलही येथे मांडण्यात आला आहे.
एका दिवशीय प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन
दरम्यान, हे प्रदर्शन केवळ एकाच दिवसासाठी असून, शनिवारी म्हणजेच आजच सायंकाळी ७ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी या एका दिवशीय प्रदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्षा अस्मिता रावेतकर यांनी केले आहे.
हेही वाचा:








