हाथरसच्या जिल्हादंडाधिकाऱ्यांना हटवावे – प्रियांका गांधी

नवी दिल्ली – हाथरसच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना हटवण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी वढेरा यांनी केली आहे.हाथरसच्या बलात्कार पीडीत युवतीच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही मागणी केली आहे.
हाथरसच्या संपूर्ण प्रकरणामध्ये जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत तपास केला जावा, अशी मागणीही प्रियांका गांधी यांनी केली आहे.पीडीत युवतीच्या कुटुंबीयांच्या मतानुसार जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी त्यांना दिलेली वागणूक सर्वात वाईट होती. ते कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत ? त्यांना ताबडतोब निलंबित करायला पाहिजे आणि त्यांच्या कामाची चौकशी करायला पाहिजे.
हाथरस प्रकरणी कुटुंबीयांकडून न्यायालयीन चौकशीची मागणी केली जात असताना सीबीआय चौकशी आणि एसआयटीकडून चौकशी का केली जात आहे, असा सवालही प्रियांका गांधी यांनी ट्विटरवरच्या पोस्टमध्ये उपस्थित केला आहे.
जर उत्तर प्रदेश सरकार जराही झोपेतून जागे असेल, तर हाथरसच्या पीडीतेच्या कुटुंबीयांचे म्हणणे ऐकावे, असे प्रियांका गांधी यांनी अन्य एका ट्विटमध्ये म्हटले आहे. 1 ऑक्टोबर रोजी हाथरसचे जिल्हादंडाधिकारी पी.के. लष्कर यांनी पीडीत युवतीच्या कुटुंबीयांमध्ये आणि आपल्यामध्ये काहीही मतभेद असल्याच्या नकारात्मक अफवा फेटाळल्या होत्या.
या कुटुंबाशी आपला नियमित संवाद असून आपण त्यांच्याशी दिड तास चर्चा केली असल्याचेही ते म्हणाले होते. त्यांच्या शंकांबाबत आपण पुन्हा त्यांच्याशी संवाद साधला असून त्यांच्याशी काहीही मतभेद नाहीत, असे दुसऱ्या दिवशीही ते म्हणाले होते.
प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी रविवारी हाथरसच्या पीडीत युवतीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या प्रकरणी पीडीत युवतीला न्याय मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी कुटुंबीयांना दिले होते.





