Jalgaon News : अतिवृष्टीग्रस्त देवगाव-मुंदाणेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; नुकसानीचा घेतला आढावा
Jalgaon News : जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज देवगाव आणि मुंदाणे या अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेत प्रशासनाला तातडीने मदत व पंचनाम्यांच्या सूचना दिल्या.
पारोळा तालुक्यातील देवगाव येथे अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या जनावरांचा मृत्यू झाला असून, काही जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाला मिळाली आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
त्यानंतर त्यांनी मुंदाणे (प्र. उ.) या अतिवृष्टीग्रस्त गावालाही भेट देत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पारोळा मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील, तहसीलदार तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाकडून पंचनामे आणि मदतकार्याला गती देण्याचे निर्देश देण्यात आले असून, नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले.





