ग्राहक माहिती गुणवत्ता निर्देशांकात जिल्हा बँक देशात अव्वल

सातारा – भारतीय रिझर्व्ह बँक मान्यताप्राप्त ‘ट्रान्सयुनियन सिबिल’ कंपनीच्या ग्राहक माहिती (डेटा) गुणवत्ता निर्देशांकात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राष्ट्रीय पातळीवर पहिला क्रमांक मिळवला आहे. कंपनीच्यावतीने मुंबई येथे झालेल्या कार्यशाळेत जिल्हा बँकेला प्रशस्तिपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कर्जदारांची गुणवत्ता पडताळणी करणारी ‘ट्रान्सयुनियन सिबिल’ कंपनीच्यावतीने सांताक्रूझ (मुंबई) येथील ताज हॉटेलमध्ये सहकारी बँकांसाठी मार्गदर्शक कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. या कार्यशाळेस जिल्हा बँकेच्या व्यक्तिगत थेट कर्जे विभागाचे अधीक्षक संग्रामसिंह शिंदे आणि अन्न प्रक्रिया तज्ज्ञ स्वप्निल निंबाळकर उपस्थित होते. ट्रान्सयुनियन सिबिल कंपनीला जिल्हा बँकेकडून ग्राहकांच्या कर्जाची परिपूर्ण आणि बिनचूक माहिती पाठवली जाते. जिल्हा बँकेच्या या कामाची दखल घेऊन, कंपनीच्यावतीने ग्राहक डेटा गुणवत्ता निर्देशांकामध्ये जिल्हा बँकेस देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचे प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.
याबद्दल बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक आमदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शिवेद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजपुरे, ज्ञानदेव रांजणे, सौ.कांचन साळुंखे व संचालकांनी बँकेचे अधिकारी आणि कर्मचार्यांचे अभिनंदन केले. केंद्र व राज्य सरकारच्या अनुदान व व्याज परतावा योजनेंतर्गत जिल्हा बँक जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजक व व्यावसायिकांना कर्जपुरवठा करत असून, त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले. सरव्यवस्थापक राजीव गाढवे व राजेंद्र भिलारे उपस्थित होते.

