नगर (प्रतिनिधी) – जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी (दि.27) रोजी दाखल 312 उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली. त्याचसोबत निवडणूक अर्जावर दाखल हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली.
राहाता तालुक्यातून अण्णासाहेब म्हस्के आणि शेवगाव तालुक्यातून चंद्रशेखर घुले यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने छाननीनंतर दोघांची बिनविरोधची निवड होण्याची शक्यता आहे. तसचे गुरुवारी (दि.28) रोजी सकाळी 11 वाजता पात्र-अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी दिली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 312 अर्जांची छाननी करण्यात आली. यात सहकार कायद्यातील निवडणूक तरतुदी नुसार दाखल अर्जांसोबत किरकोळ त्रुटी राहिलेल्या असल्यास त्यास छाननीच्या दिवशी काही अवधी देवून संबंधित त्रुटी अर्जदारांकडून पूर्ण करून घेण्यात आल्या. यासाठी संबंधितांना दुपारी चार वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेला होता.
दरम्यान, श्रीरामूर विविध कार्यकारी सोसायटीमधून दीपक पटारे यांच्या उमेदवारी अर्जावर दुसरे उमेदवार करण ससाणे यांनी हरकत घेत पटारे हे अशोक बँकेचे थकबाकीदार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले. हरकत क्रमांक दोनमध्ये ससाणे यांनी हाच मुद्दा पटारे यांच्या ओबीसी मदारसंघातील अर्जावर घेतला आहे.
तिसरी हरकत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नगर तालुक्यातील सोसायटी मतदार संघातील उमेदवार सत्यभामाबाई बेरड यांच्या अर्जावर घेतली आहे. त्याच्या उमेदवारी अर्जासोबत दाखल कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगण्यात आले. चौथी हरकत जामखेडचे उमेदवार अमोल राळेभात यांनी उमेदवार सुरेश भोसले यांच्या अर्जावर घेतली आहे.
भोसले यांचे सूचक व अनुमोदक एकच असल्याचे राळेभात यांचा आक्षेप आहे. पाचवी हरकत जामखेडचे भोसले यांनी अमोल राळेभात यांच्या अर्जावर घेतली आहे. यातही राळेभात यांच्या अर्जावर सूचक एकच असल्याचा आक्षेप आहे.
या सर्व हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली असून, आज सकाळी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आहेर यांनी सांगितले. माघारीसाठी 28 जानेवारीपासून 11 फेबुवारीपर्यंत मुदत आहे.