छत्रपती संभाजीनगर – पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत बोटाला शाई लावून पैशांचे वाटप होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणी निवडणूक आयोग व पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी 18 लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे 2 कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडली, असे ते म्हणाले आहेत. त्यांच्या या आरोपानंतर स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. दानवे यांनी रात्री उशिरा केलेल्या एका ट्विटमध्ये उपरोक्त आरोप केला. त्यात ते म्हणाले, याचा अर्थ बहुदा निवडणूक आयोगाला संभाजीनगरात निःपक्षपाती निवडणूक घ्यायची नाही. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाई कोणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली, हा प्रश्न आहे. याचा तातडीने निवडणूक आयोगाने खुलासा करायला हवा आणि प्रकरणात तातडीने कायदेशीर कारवाई करावी, असे ते म्हणाले. दानवे यांनी मंगळवारी सकाळी एका पत्रकार परिषदेतही या आरोपांचा पुनरुच्चार केला. संभाजीनगरात शिंदे गट व भाजप विशेषतः शिंदे गटाची मंडळी मुस्लिम मतदारांतील काही दलाल हाताशी धरून त्यांचे आधार कार्ड व निवडणूक ओळखपत्र जमा करून घेत आहेत. त्यांच्या बोटाला शाई लावायची आणि मतदान न करण्याच्या मोबदल्यात त्यांना पैसे दिले जात आहेत. या प्रकरणी मतदानासाठी वापरली जाणारी शाई बाहेर कशी येते? हा माझा पहिला प्रश्न आहे. हा प्रकार होत असताना पोलिस व निवडणूक आयोग आक्रमक कारवाई का करत नाही. यासाठी कार्यकर्त्यांना पोलिसांना भांडावे लागते. त्यानंतर कारवाईचे थोतांड केले जाते. त्यामुळे पोलिस यंत्रणा आरोपींना मदत करत आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंबंधी निवडणूक आयोगही संशयाच्या भोवऱ्यात आहे.