satara | देगावच्या शेतकऱ्यांना आंबा व लिंबाच्या झाडांचे वाटप

सातारा, (प्रतिनिधी) – सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या कर्म प्रतिष्ठानने वृक्षारोपणाबरोबर वृक्ष संवर्धनाच्या कामात पुढाकार घेतला आहे. प्रतिष्ठानमार्फत देगाव (ता. सातारा) येथील शेतकऱ्यांना केशर जातीच्या आंब्यांची व लिंबांच्या झाडांचे वाटप करण्यात आले.
ही झाडे फक्त त्याच शेतकऱ्यांना दिली जे या झाडाचे जोपासना करणार आहेत. कर्म प्रतिष्ठान या झाडाचे जपणूक, जोपासना होतेय का याचा मागोवा घेणार आहे. तसेच झाडाला लागणारी औषधे व खत सुद्धा उपलब्ध करून देणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. अर्चना देशमुख यांनी दिली.
कर्म प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला, युवतींसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. याचबरोबर शेतकऱ्यांनाही विविध प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येते. यावर्षी प्रतिष्ठानने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनावर भर दिला आहे. त्यानुसार देगाव येथील शेतकऱ्यांना केसर आंबा व लिंबाच्या झाडांचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अर्चना देशमुख, कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब केवटे, सरपंच वैशाली साळुंखे, उपसरपंच अशोक ननावरे, माजी उपसरपंच विकास पवार, रुपाली साळुंखे, खुडे, मनोज लाेणकर, गोविंद माने, विनायक साळुंखे, राणी पवार, नितीन पिसाळ आदी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब केवटे यांनी ग्रामस्थांना बांबू लागवडी विषयी मार्गदर्शन केले.
फक्त फोटो काढण्यासाठी वृक्षारोपण करण्यापेक्षा जे शेतकरी झाडे लावण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना योग्य ती देशी झाडे दिल्यास वृक्ष लागवड, संगोपन, जोपासना नक्की होईल.
कर्म प्रतिष्ठान वृक्षारोपणाबरोबर वृक्षसंवर्धाच्या कामात यापुढे आणखी जोमाने काम करणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचाा आमचा प्रयत्न राहणार आहे. सौ. अर्चना देशमुख (अध्यक्षा कर्म प्रतिष्ठान)




