पेठ येथे शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप सुरू

करोनामुळे रोज टप्प्याटप्प्याने वाटप करण्यात येणार
पेठ (वार्ताहर) – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेत पेठ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे खरीप हंगामाचे नियमित कर्ज भरणाऱ्यांचे पीककर्ज वाटप चालू झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
शेतकऱ्याने मागील कर्ज भरून शून्य टक्के व्याजदराचा लाभ घेण्यासाठी उसनवारीने पैसे गोळा केलेले असतात. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना तातडीने नव्याने कर्ज मिळणे अपेक्षित असते. नियमित कर्ज भरणारे सहाशे सभासद आहेत. एकूण साडेतीन कोटींचे पीक कर्ज वाटप आहे. करोना या विषाणूमुळे रोज टप्प्याटप्प्याने वाटप करण्यात येणार आहे.
जेणेकरून सोसायटी आणि बॅंकांमध्ये गर्दी होऊ नये. सोसायटीचे माजी चेअरमन सुखदेव बुट्टे व विद्यमान चेअरमन विनायक धुमाळ यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून तातडीने कर्जवाटप करण्याच्या सूचना केल्या होत्या. आज सोसायटीच्या पीककर्ज वाटपप्रसंगी सोसायटीचे चेअरमन विनायक धुमाळ, सचिव मच्छिंद्र निघोजकर, विकास अधिकारी डी. आर. पारधी, शाखाप्रमुख ए. एन. लोंढे, दिलीप पवळे, सुदाम काळे, बबन शिंदे, सुरेश धुमाळ, सुभाष धुमाळ, अशोक गुंजाळ, क्लार्क संदेश बुट्टे आदी उपस्थित होते.





