Shirur News : जि. प. शाळेच्या हद्दीत गाळे : मांडवगण फराटा येथे गाळेधारक व पोलिसांत तणाव

निमोणे : गेल्या 30 ते 35 वर्षांपासून सुरू असलेले गाळे हे जिल्हा परिषद शाळा, मांडवगण फराटा यांच्या हद्दीत येत असल्याचे स्पष्ट होताच, शनिवारी त्या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. प्रशासनाकडून कारवाईची शक्यता लक्षात घेत गाळेधारकांनी विरोध केला, तर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत होते.
यावेळी गाळेधारक व पोलिस यांच्यात काही काळ शाब्दिक चकमकही झाली. अनेक गाळेधारकांनी आपली आर्थिक गुंतवणूक व दीर्घकाळ चालवलेला व्यवसाय लक्षात घेऊन गाळ्यांचे पुनर्वसन किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, ग्रामस्थांतूनही या कारवाईबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी शाळेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाच्या भूमिकेचं समर्थन केलं, तर काहींनी अचानक केलेल्या हालचालींवर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी स्थानिक प्रशासन पुढील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





