RohitvsVirat | मोठेपणाच्या वादाचा भारतीय क्रिकेटला फटका

मुंबई – हिटमॅन रोहित शर्मा व विराट कोहली यांच्यातील वादामुळे येत्या काळात भारतीय क्रिकेटची फरपट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. टी-20 संघाचे कर्णधारपद सोडल्यावर एकदिवसीय कर्णधारपदही गमावलेल्या कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून विश्रांती घेण्याचे संकेत दिल्याने या वादाच्या वृत्ताला बळ मिळाले आहे.
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळो रोहितने माघार घेतली आहे. हे सर्व वरवर खरे दिसत असले तरीही हे दोघेही खेळाडू आता येत्या काळात एकमेकांच्या नेतृत्वाखाली खेळणारच नाहीत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
येत्या गुरूवारी भारताचा कसोटी संघ कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होण्यासाठी रवाना होत असून 26 डीसेंबरला बॉक्सिंग डे कसोटीने या मालिकेला प्रारंभ होणार आहे. कसोटी मालिका पार पडल्यावर या दोन संघात एकदिवसीय सामन्यांची मालिकाही होणार आहे. मात्र, त्याचदरम्यान कोहलीच्या कन्येचा वामिकाचा 11 जानेवारीला वाढदिवस असल्याने त्याने कुटुंबाला वेळ देण्यासाठी माघार घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. आता हे सगळे सत्य आहे की हे दोघे खेळाडू येत्या काळात एकमेकांच्या नेतृत्वाखाली खेळणार नाहीत, असेच चित्र सध्या दिसत आहे.
कोहलीने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व सोडले व त्याच्या जागी रोहितकडे ही जबाबदारी दिली गेली. तसेच त्यानंतर काही दिवसांतच कोहलीकडून एकदिवसीय संघाचे नेतृत्वही काढून घेण्यात आले व ती जबाबदारी देखील रोहितकडेच देण्यात आला व त्याचवेळी या दोन खेळाडूंमध्ये मोठा कोण असे चित्र निर्माण झाले. टी-20 संघाचे नेतृत्व स्वीकारताना रोहितने एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाचीही मागणी केली होती.
मर्यादीत षटकांच्या सामन्यांसाठी एकाच खेळाडूकडे कर्णधारपद असावे असे मत मांडत बीसीसीआयने दोन्ही संघांची जबाबदारी रोहितकडे दिली. आता कोहलीकडे केवळ कसोटी संघाचे नेतृत्व आहे. कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे त्याने पुन्हा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून विश्रांती घेण्याचा निर्णय का घेतला याचीच आता चर्चा सुरु झाली आहे.
उपकर्णधारपदी कोण
कोहलीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित खेळणार नसल्याने उपकर्णधारपद कोणाकडे देण्यात येणार हा मोठा प्रश्न बीसीसीआयसमोर निर्माण झाला आहे. लोकेश राहुल हा पर्याय समोर असला तरीही त्याबाबत बीसीसीआयने अद्याप काहीही जाहीर केलेले नाही.
एकदिवसीय मालिकेतही फटका बसणार
दुखापतीचे स्वरुप गंभीर असल्याने रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतूनही माघार घेणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच कोहली देखील या मालिकेतून माघार घेण्याचे संकेत देत असल्यामुळे भारतीय संघाला सेकंड बेंचवरच अवलंबून राहावे लागणार आहे. मुळातच संघातील अनेक खेळाडू अद्याप तेथे खेळलेले नसल्याने रोहित व कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ कशी कामगिरी करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.





