‘शिंदे सरकार बरखास्त करून राज्यात त्वरीत निवडणूका घ्या…’; उद्धव ठाकरे यांची मागणी

Uddhav Thackeray – महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थास्थितीचे तीन तेरा झाले असून राज्यातील एकनाथ शिंदे सरकार त्वरीत बरखास्त करून येथे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांना पुर्वी मी फडतूस आणि कलंक असे शब्द वापरले आहेत. त्यामुळे आता माझ्याकडे दुसरे शब्द नाहीत. आपल्याला मनोरूग्ण गृहमंत्री लाभला आहे अशी जळजळीत टीकाही त्यांनी केली.
आज येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी राज्यात नव्याने निवडणुका घेण्याचीही मागणी केली. राज्य सरकार टोळीवाल्यांना संरक्षण देत असल्याचा आरोपही माजी मुख्यमंत्र्यांनी केला.
ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी सायंकाळी स्थानिक व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते मॉरिस नोरोन्हा यांच्या फेसबुक लाईव्हदरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
नोरोन्हा यांनी नंतर आत्महत्या केली. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. त्याच्या आधी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी 2 फेब्रुवारी रोजी मुंबईजवळील उल्हासनगर येथे जमिनीच्या वादातून शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यावर गोळ्या झाडून जखमी केले होतेया पाश्र्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली आहे.
ठाकरे म्हणाले की राज्यात गेल्या काही दिवसांपासूनएकामागोमाग एक अशा पद्धतीने विचीत्र घटना घडल्या. त्यामुळे आम्ही राज्यपालांकडे जाऊन सरकारच्या विरोधात निवेदन देणे अपेक्षित होते परंतु एका राज्यपालांचा गुंडाबरोबरचा फोटो प्रसिद्ध झाल्यामुळे आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही. घोसाळकर हत्या प्रकरणाच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की,
त्याच्यावर गोळ्या झाडल्याची घटना फेसबुकवर दिसली. त्याला गोळ्या मारल्याचेही दिसले पण त्या गोळ्या नेमक्या कोणी झाडल्या हे दिसले नाही. त्यानंतर मारकेऱ्यानेच आत्महत्या कशी केली अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. आपल्या राज्याला मनोरूग्ण गृहमंत्री लाभला आहे अशी टीकाही त्यांनी केली.





