Disha Salian : दिशा सालियन प्रकरणात महायुतीच्या ‘या’ नेत्याने घेतली आदित्य ठाकरेंची बाजू

रायगड : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे. आपल्या मुलीची हत्या झाली असून गँगरेप झाल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे. या प्रकरणामुळे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर सत्ताधारी गटातील नेत्यांनीच थेट आरोप केले आहे. एकीकडे हे आरोप होत असताना महायुतीच्या एका नेत्याने आदित्य ठाकरेंची बाजू घेतली आहे.
मंत्री रामदास आठवले यांनी घेतली आदित्य ठाकरेंची बाजू
रामदास आठवले हे रायगडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दिशा सालियन प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. ‘दिशा सालियान हिचा मृत्यू हा अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात उध्दव ठाकरे यांचं सरकार असताना चर्चा झाली होती आणि म्हणून आदित्य ठाकरे यांचा या मध्ये समावेश आहे की नाही याबाबत मला माहिती नाही किंवा आदित्य ठाकरे यांना या प्रकरणात टार्गेट करण्याची कोणतीच भूमिका आमची नाही, असे रामदास आठवले म्हणाले.
तसंच, ‘दिशा सालियन हिच्या आई वडिलांनी केलेल्या तक्रारीवर या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. पण या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा समावेश असेल असे मला अजिबात वाटत नाही. यासंदर्भातील चौकशी ही निःपक्षपातीपणाने होणे गरजेचे आहे. शिवाय आदित्य ठाकरे यांना यामध्ये टार्गेट करू नये असेदेखील रामदास आठवले म्हणाले.





