Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात महाराष्ट्रातील बड्या नेत्याचं वक्तव्य; थेट नारायण राणेंचं नाव घेत म्हणाले….

Disha Salian Case – दिशा सालियान मृत्यू प्रकरणाला पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा नवे वळण मिळाले असून, या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. दिशा सालियानच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
यात दिशावर सामूहिक बलात्कार आणि हत्या झाल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे. या घटनेनंतर खासदार आणि भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गौप्यस्फोट केले. दिशा सालियान प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा आपल्याला दोनवेळा फोन येऊन गेल्याचा दावा नारायण राणे यांनी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “नाही साहेब मला हे बोलायचंय तुम्हाला मुलं आहेत. मलाही मुलं आहेत. सध्या तुम्ही जे काही प्रेसला बोलता. आदित्यचं नाव घेता. माझी विनंती आहे की तुम्ही त्याचा उल्लेख करू नये. असं वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला” असा दावा नारायण राणे यांनी केला.
दरम्यान, अश्यातच नारायण राणे यांच्या या दाव्यावर आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राणसाहेब सांगतायत, त्यांचं काय बोलणं झालय हे मी सांगू शकत नाही. पण ते जेव्हा सांगतायत, मला फोन केला होता, आता या बाबत मी अधिक बोलणं योग्य नाही. पण ते सांगतायत तर त्यात तथ्य असेल” असं भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले.
आदित्य ठाकरे काय म्हणाले पाहा…
तर स्वतः आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “गेल्या पाच वर्षांपासून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे प्रकरण आता न्यायालयात आहे, त्यामुळे मी यावर कोर्टातच बोलेन.” त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सत्ताधाऱ्यांवरही टीका केली. “आम्ही राज्याचे मुद्दे सभागृहात मांडतो, पण सत्ताधारी सभागृहाचे कामकाज बंद पाडतात, कारण त्यांच्याकडे कोणताही अजेंडा नाही,” असे ते म्हणाले.
राजकीय नेत्यांमध्ये दोन गट :
दरम्यान, दिशा सालियान प्रकरणावर राजकीय नेत्यांमध्ये दोन गट पडलेले दिसत आहेत. एकीकडे आदित्य ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांनी हे प्रकरण राजकीय हेतूने उकरले गेल्याचा दावा केला, तर भाजप आणि काही सत्ताधारी नेत्यांनी यात तथ्य असल्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली. शिंदे गट आणि अजित पवार गटातील काही नेत्यांनी मात्र ठाकरेंची पाठराखण केल्याने राजकीय समीकरणे गुंतागुंतीची झाली आहेत.





