Pimpri : पावसाळ्यात वाढताहेत आजार

पिंपरी : सध्या पावसाळ्याचा जोर वाढत असून या ऋतूमध्ये विविध प्रकारचे आजार उद्भवण्याची शक्यता अधिक असते. डेंग्यू, मलेरिया, पोटाचे विकार, श्वसनाचा त्रास आणि संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. या पार्श्वभूमीवर आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या वतीने नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेमध्ये पावसाळ्यात नागरिकांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या पत्रकार परिषदेला रुग्णालयातील वरिष्ठ डॉ. अविनाश मुंडे, डॉ. राहुल बस्ते, डॉ. प्रिया मानकरे आणि डॉ. पार्थ दलाल हे उपस्थित होते.
पावसाळा हा निसर्गभ्रमंती सोबतच आजारांसाठीही अनुकूल असतो, त्यामुळे उकळलेले पाणी पिणे, योग्य आहार घेणे, डासांची निर्मिती रोखण्यासाठी प्रयत्न करणे, नियमित तपासण्या आणि स्वच्छतेकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. स्वतःसोबतच कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेणे ही काळाची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी मांडले. सर्वच डॉक्टरांनी नागरिकांनी पावसाळा आनंदाने अनुभवावा, मात्र त्यासाठी आवश्यक ती आरोग्यविषयक काळजी घेतली पाहिजे, असा महत्त्वाचा संदेश सर्व तज्ञांनी दिला.
कोविड विषाणूचा नवीन प्रकार जेएन १
सध्याचा कोविड प्रकार जेएन १ नावाने ओळखला जात आहे. या रोगाची लागण झपाट्याने होत असली तरी त्याची तीव्रता तुलनेत कमी आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना याचा त्रास अधिक जाणवतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. विशेषतः कोविडच्या नव्या जेएन १ प्रकारामुळे सामान्य सर्दी, खोकला, उलटी, जुलाब यांसारखी लक्षणे दिसत आहेत, जी पचनाशी संबंधित त्रासासारखी वाटतात. त्यामुळे चुकीचे निदान होण्याचा धोका वाढला आहे.
सध्याच्या वातावरणामुळे डेंग्यूच्या डासांसाठी आवश्यक असलेले साचलेले पाणी कमी असल्याने अद्याप डेंग्यूचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला नाही. मात्र, नागरिकांनी निष्काळजी न राहता आवश्यक ती खबरदारी घ्यावी. घरातील आरो फिल्टर साफ करणे, शरीराची व्यायामाने देखील काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच कोविड आणि अन्य संसर्गजन्य आजारांची वेळीच तपासणी करून घ्यावी.
– डॉ. अविनाश मुंडे, आपत्कालीन सेवा विभागप्रमुख
कोविड महामारीच्या काळात सर्वांनी स्वच्छतेचे काटेकोर पालन केल्यामुळे पावसाळी आजारांमध्ये घट झाली होती. त्यामुळे असे प्रतिबंधात्मक उपाय नियमितपणे राबवले, तर रुग्णसंख्या निश्चितच कमी होऊ शकते.
– डॉ. पार्थ दलाल, पेडियाट्रिक आयसीयू इंचार्ज
मांसाहार करत असताना दुग्धजन्य पदार्थ एकत्रितपणे घेणे टाळावे. कोणताही त्रास जाणवताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लक्षणे लहान असली तरी दुर्लक्ष करू नका. बरेच आजार हे व्हायरल अथवा बॅक्टेरियल असून योग्य वेळी तपासणी आणि औषधोपचार घेतल्यास सहज बरे होऊ शकतात. पण बऱ्याच वेळा लोक स्वतःच औषधे घेऊन आजार बिघडवतात. त्यामुळे स्वच्छता राखणे, उकळलेले/फिल्टर केलेले पाणी पिणे, बाहेरचे अन्न टाळणे आणि वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
– डॉ. राहुल बस्ते, औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार
पावसाळा सुरू होताच शाळा देखील सुरू होतात. अशावेळी मुलांना घराबाहेर पाठवताना विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. लहान मुलांना पूर्ण कपडे घालावेत. डासांपासून संरक्षणासाठी त्यांच्या अंगावर डास प्रतिबंधक सारखी औषधे लावावीत. अन्नपाण्याची स्वच्छता राखावी. पावसात भिजल्यास लगेच कपडे बदलणे व वाळवणे आवश्यक आहे.
– डॉ. प्रिया मानकरे, निरीक्षण बालरोग तज्ञ





