पुणे जिल्हा | दादांविरोधात दोन आप्पांची चर्चा

पारगाव, {त्रिभूज शेळके} – विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे वेगवेगळ्या मतप्रवाहाचे वारेही तालुक्यात फिरू लागले आहे. उमेदवारीच्याबाबतीत महायुतीकडून विद्यमान आमदार म्हणून राहुल कुल यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित मानले जात आहे.
तालुक्यात “दादा’ विरुद्ध “आप्पा’ च अशीच निवडणूक होणार यावरच चर्चा झडत आहेत. मात्र, आता दौंडच्या आखाड्यात [अजित पवार गटाचे माजी आमदार रमेश थोरात आणि शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, असे दोन ‘आप्पा’ उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार राष्ट्रवादी चे दौंड तालुक्यातील प्रमुख व माजी आमदार रमेश (अप्पा) थोरात व शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते व दौंड पंचायत समितीचे माजी सभापती अप्पासाहेब पवार. असे दोन आप्पा दौंड च्या राजकारणात सक्रिय झाले आहेत.
माजी आमदार रमेश थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी उभारी घेतली असून मागील निवडणुकीत थोरात यांचा निसटता पराभव जिव्हारी लागल्याने त्यांनी पुन्हा निवडणूक लढवावी मग ती अपक्ष असो किंवा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षातून असो, असा सूर जोर धरू लागला आहे. शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडूनच निवडणूक लढवावी, अशी बहुतांश ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मागणीचा रेटा जोर धरू लागला आहे.
शरद पवार व अजित पवार या दोघांच्या पक्षीय विभाजनात दौंड पंचायत समितीचे माजी सभापती अप्पासाहेब पवार हेच शरद पवार यांच्या सोबत राहिले. लोकसभा निवडणुकीत दौंड तालुक्यातून सुप्रिया सुळे यांना २६ हजारांचे मताधिक्य मिळाले. यामागे अप्पासाहेब पवार यांचा सहभाग महत्वाचा मानला जातो.
त्यामुळे आप्पासाहेब पवार हेच शरद पवार पक्षाचे विधानसभेचे दावेदार असल्याचा दावा अप्पासाहेब पवार यांचे कार्यकर्ते करीत आहेत.
यावेळी विधानसभेला आमदार राहुल कुल यांच्या विरोधात दोन आप्पा आखाड्यात उतरणार आहेत, अशी चर्चा होत असली तरी नक्की कोणते एक” अप्पा’ निवडणूक लढविणार कि दोन्ही “अप्पा’ मैदानात उतरणार हे येणारा काळच ठरवेल.
राजकीय लेखाजोखा मांडूनच समीकरणे
निवडणुकीत राजकीय नेते मंडळींना आपल्या गटातून सध्या किती गेले. त्यांच्या मागील मतांचा आणि आपल्या गटात नवीन किती आले. यांच्या मागील मतांचा विचार करून त्या मागील फायदे व तोटे याचा विचार करूनच समीकरणे जुळवावी लागणार आहे. कारण ग्राउंड लेव्हलला प्रत्येक गावात अजूनही दोन गट आहेत.
ते म्हणजे भाजपा आणि राष्ट्रवादी. राष्ट्रवादीमध्ये जरी दोन गट पडले असतील तरी ते वरिष्ठ पातळीवर आहेत. परंतु ग्राउंड लेव्हलला मात्र याची प्रचिती लोकसभेला आली आहेच. त्यामुळे आपल्या कट्टर कर्यांकर्त्यावरच भिस्त ठेऊन निवडणुकीला सामोरे जावे लागणार, हे मात्र नक्की.





