Pune District : वळसे पाटलांना मंत्रीपद मिळाले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

मंचर : राज्यातील अभ्यासू, ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांना महायुती सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले नसल्याने कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यात प्रलंबित राहिलेल्या विकास कामांसाठी काम करायचे आहे. तसेच तालुक्यात सर्वाधिक वेळ देण्याच्या उद्देशाने वळसे पाटील यांनीच मंत्रीपद नाकारले, असे खासगीत बोलले जात आहे.
राज्यात जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता यायची त्यावेळेस वळसे पाटील यांना मंत्रीपद दिले जायचे, हे समीकरण गेली अनेक वर्षे होते. अनेकदा जी खाती अडचणीत असायची ती खाती वळसे पाटील यांना देण्यात आली होती. त्यामध्ये अर्थ खाते, ऊर्जा खाते, गृह खाते ही खाती वळसे पाटलांनी सांभाळून त्या ठिकाणी व्यवस्थित काम केले आहे. आतापर्यंत दिलीप वळसे पाटील यांनी विविध मंत्रिपदे भूषवली असून, त्यांना दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडत मंत्रीपदाला साजेल, असे काम केले आहे. मंत्र्याच्या शब्दाला किंमत असते, तालुक्याचे आमदाराला मंत्री पद मिळाले तर तालुक्यातील कामे लवकर मार्गी लागतात, मात्र यावेळी वळसे पाटील यांना मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
वळसे पाटील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मागील निवडणुकांमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले. मात्र यावेळी त्यांच्या मताधिक्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे करूनही जनतेने म्हणावा असा कौल दिला नसल्याने या पुढील काळात आंबेगाव तालुक्यातच जनतेसाठी काम करायचे आहे, असा निश्चय त्यांनी केला आहे. तालुक्यात मुख्यत्वे करून असलेल्या पाण्याचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करायचे आहे. असे आमदार दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्ती आणि शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा यांनी सांगितले.
स्वत:हून मंत्रिपद नाकारले..
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर महायुतीत समाविष्ट असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आमदारांना मंत्रीपद मिळणार यामध्ये वळसे पाटलांचे नाव आघाडीवर होते. मात्र मंत्रिपद मिळाले तर राज्याची मोठी जबाबदारी मिळेल, त्यामुळे तालुक्याकडे लक्ष देता येणार नाही. तसेच काही दिवसांपूर्वी वळसे पाटील यांचा छोटासा अपघात झाल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी प्रकृतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच तब्येतीची काळजी घेण्याच्या डॉक्टरांच्या उद्देशाने त्यांनी स्वत:हून मंत्रिपद नाकारले असे ते खासगीत बोलले असल्याची चर्चा आहे.
दिलीप वळसे पाटील यांचा राजकीय जीवनपट
– १९९०-१९९५. १९९५-१९९९, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९, ऑक्टोबर, २०१९ – २०२४, मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड
– महाराष्ट्र विधानसभाः १९९२-१९९३ समिती प्रमुख, विधिमंडळ अंदाज समितीः राष्ट्रकुल संसदीय मंडळ. महाराष्ट्र शाखेतर्फे सन १९९७-१९९८ मध्ये महाराष्ट्र विधान सभेतील “उत्कृष्ट संसदपटू” या पुरस्काराने सन्मानित
-ऑक्टोबर १९९९ ते डिसेंबर, २००२- उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री
-डिसेंबर, २००२ ते जानेवारी २००३- उच्च व तंत्रशिक्षण आणि ऊर्जा खात्याचे मंत्री
-जानेवारी २००३ ते नोव्हेंबर २००४ – ऊर्जा व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री
-नोव्हेंबर २००४ ते मार्च २००५ – ऊर्जा (अपारंपरिक ऊर्जा वगळून) व वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री
-मार्च २००५ ते डिसेंबर २००८ – ऊर्जा (अपारंपरिक ऊर्जा वगळून), वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री
-डिसेंबर २००८ ते ऑक्टोबर २००९ – वित्त व नियोजन खात्याचे मंत्री
-२००९-२०१४ – अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा
-जानेवारी २०२० ते ५ एप्रिल २०२१ कामगार व राज्य उत्पादनशुल्क खात्याचे मंत्री
-६ एप्रिल २०२१ ते जुलै २०२२ गृह खात्याचे मंत्री.
-जुलै २०२३ पासून सहकार खात्याचे मंत्री





