पिंपरी | पवना धरणातून विसर्ग बंद

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने धरणातून होणारा विसर्ग बंद करण्यात आल्याची माहिती राज्याच्या पाटबंधारे विभागाकडील पवना धरण व्यवस्थापनाकडून कळविण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी पवना धरणात ९७.७३ टक्के इतका पाणीसाठा आहे.
मागील आठवड्यात पाऊस चांगला पडल्याने पवना नदीला पूर आला होता. नदीपात्रातील पाणी लोकवस्तीत घुसल्याने हजारो नागरिकांना स्थलांतर करावे लागले होते. दरम्यान, शुक्रवारी (दि. ९) धरणातील साठवण क्षमतेचा विचार करता नदीपात्रात १४०० क्युसेक विसर्ग करण्यात आला होता.
शनिवारी (दि. १०) पाऊस कमी झाल्याने विसर्ग १४०० क्युसेकवरून ८०० वर आणण्यात आला. तीन ते चार दिवसांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणातून विसर्ग बंद करण्यात आला आहे.
त्यामुळे पवना नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली असून पुराचा धोका राहिलेला नाही. आजअखेर पवना धरणातून होणारा विसर्ग बंद करण्यात आल्याचे पाठबंधारे विभागाकडील पवना धरण व्यवस्थापनाकडून कळविण्यात आले आहे.
भविष्यात पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्ग बंद अथवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही कळविण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी पाटबंधारे विभागाने दिलेल्या आकड्यांनुसार धरणात ९७.७३ टक्के इतका पाणीसाठा आहे. तर या पावसाळ्यात आतापर्यंत २५०६ मिमी इतका पाऊस पडला आहे.
गेल्या वर्षी आजच्या दिवशी शहरात ९५.८० टक्के पाणीसाठा होता आणि २०५९ मिमी इतका पाऊस झाला होता. गेल्या वर्षी संपूर्ण पावसाळ्यात एकूण २८८२ मिमी पाऊस झाला होता.





