पुणे | आपत्ती व्यवस्थापन पथकेच गायब !

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात यंदा प्रत्येक मोठ्या पावसानंतर रस्त्यांवर पाण्याची तळी साचत आहेत. शहरातील वाहतुकीचा मंदावलेली आहे. तर, या पाण्यामुळे नागरिकांनाही मोठ्या मनस्तापाचा त्रास सहन करावा लागत आहे.
पूरस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी महापालिकेकडून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर नेमण्यात आलेली पथके गायब असल्याचे समोर आले आहे.
या प्रकाराची दखल घेत महापालिका आयुक्तांनी मलनि:सारण विभागास फैलावर घेत क्षेत्रीय कार्यालयांनी तत्काळ ही पथके कार्यान्वित करावीत, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, केवळ घटना घडल्यानंतरच महापालिका जागी होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मागील तीन दिवसांपासून शहरात पावसाने धुमाकूळ घातला असून, एक ते दोन तासांतच तब्बल १०० ते ११० मिमीपेक्षा अधिक पाऊस होत आहे.
अशा वेळी पाणी साठणारे स्पाॅट निश्चित करून तेथे नियमित स्वच्छता तसेच पाऊस पडताच तत्काळ पाण्याच निचरा करण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात करण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.
त्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास २५ कर्मचारी पथक साहित्यासह देण्यात आले आहे. मात्र, ही स्थिती रोखण्यासाठी महापालिकेची प्रतिसाद देणारी यंत्रणाच गायब झाली आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांची पथके पुन्हा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मागील तीन दिवसांपासून शहरात पाणी का साचून राहिले, याबाबत त्यांंच्याकडून माहिती घेऊन काम झालेले नसल्यास तत्काळ कारवाई केली जाईल.- राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका





