दिव्यांग कर्मचाऱ्यांना मिळणार वाहतूक भत्ता

पुणे – अपंग समावेशित शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत दिव्यांग विशेष शिक्षक व कर्मचारी यांना वाहतूक भत्ता लागू केला आहे. यामुळे २१६ दिव्यांग कर्मचारी यांना वाहतूक भत्त्यासाठी ३२ लाख २९ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षक शिक्षण या योजनांचे एकत्रिकरण करून २०१८-१९ पासून केंद्रीय योजना समग्र शिक्षा योजना अंमलात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मधील शिफारशींच्या अनुषंगाने समग्र शिक्षा योजनेची पुनर्रचना करण्यात आली आहे.
सदर योजनेचे केंद्र आणि राज्य हिस्स्याचे प्रमाण ६०:४० असे आहे. सर्व मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने व्यवस्थापनांतर्गत मंजूर असलेल्या पदांपैकी काही पदे प्रतिनियुक्तीने तर काही पदे करार, कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत.
समग्र शिक्षा योजनेंतर्गत मानधनावर कार्यरत असणाऱ्या जिल्हा समन्वयक – ६, विशेष तज्ञ व समावेशित शिक्षक – ५२, विशेष शिक्षक – १५८ असे एकूण २१६ दिव्यांग कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे वाहतूक भत्ता लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. वाहतुक भत्त्यचा निधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक यांचेकडे सुपूर्त करण्यात येत आहे.





