Bachchu Kadu : दिव्यांग नागरिकांना 6 महिन्यांपासून पैसेच नाहीत; माजी आमदार बच्चू कडू यांचा सरकारवर प्रहार

अमरावती : लाडक्या बहिणींना ॲडव्हान्स पैसे देता आणि कष्ट करणाऱ्या लोकांना पैसे देत नाहीत, असे म्हणत प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. लाडकी बहीण योजना ही सत्तेसाठी आणलेली योजना आहे. दिव्यांग नागरिकांना 6 महिने झाले पैसे मिळाले नाहीत, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
त्यांनी एमपीएससी परीक्षांवर देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले, याबाबत राजकारणी आणि प्रशासनातील लोकांना फार गांभीर्य नाही. शहरात युवक अभ्यास करून नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. तरी नोकरी मिळत नसेल तर काय बंदुक घ्यावी का हातात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यापेक्षा केंद्र सरकार महत्वाचं आहे.
केंद्रात अजित पवारांपेक्षा शरद पावर आणि उद्धव ठाकरे सक्षम आहेत, असे बच्चू कडू म्हणाले आहेत. तसेच बीड प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की रामाचे मंदिर बांधून देशावर उपकार केले पण त्याचे रामराज्य तयार झाले पाहिजे. अनेक वाल्मीक कराड आहेत. पण कष्ट करणारे उपाशी मरतात हे दुर्दैवी असल्याचे बच्चू कडू म्हणाले आहेत.
देशातील पहिलीच घटना
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर बच्चू कडू म्हणाले, ही देशातील पहिली घटना आहे की, सत्तेतील माणूस राजीनामा मागतोय आणि सत्तेतील माणूस राजीनामा देत नाही. काही लोक याचे राजकारण करत आहेत. कोणत्या गोष्टीचे राजकारण करावे कोणत्या नाही, याचा ताळमेळ राहिला नाही.





