Asian squash championships : दीपिका-संधूला मिश्र दुहेरीचे जेतेपद

हुआंगझोउ (चीन) – दीपिका पल्लीकल कार्तिक आणि हरिंदरपाल सिंग संधू यांनी आशियाई स्क्वॉश मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. यासह भारताने आपल्या मोहिमेचा शेवट दोन पदकांसह केला. अनाहत सिंग आणि अभय सिंग यांनी यापूर्वी कांस्यपदक पटकावले होते.
उपांत्य फेरीत अनाहत आणि अभय यांचा मलेशियाच्या इव्हान युवेन आणि रॅचेल अरनॉल्ड यांच्याकडून पराभव झाला, पण अंतिम फेरीत दीपिका-संधू या अनुभवी जोडीने युवेन आणि रॅचेलचा 11-10, 11-8 असा पराभव करत अनहत-अभयच्या पराभवाचा वचपा काढला.
दीपिका ही भारताचा स्टार फिनिशर फलंदाज दिनेश कार्तिकची पत्नी आहे. दीपिका आणि संधूसाठी अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत आयरा अजमान आणि शफिक कमाल या अव्वल मानांकित मलेशियाच्या जोडीचा पराभव केला.
उपांत्य फेरीत भारतीय जोडीने पाकिस्तानच्या तयेब अस्लम आणि फैजा जफरचा पराभव केला. या स्पर्धेत इराण, हॉंगकॉंग आणि यजमान चीन या सहा देशांचे अव्वल खेळाडू सहभागी झाले होते.





