Dipak Pathak : एअर इंडियाचे क्रू मेंबर दीपक पाठक यांच्यावर अंत्यसंस्कार; बदलापूरकरांनी साश्रूनयनांनी दिली श्रद्धांजली

ठाणे : अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बदलापूरचे रहिवासी आणि एअर इंडियाचे केबिन क्रू मेंबर दीपक पाठक यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बदलापूरकरांनी साश्रूनयनांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तर दीपकचा मृतदेह पाहून त्यांच्या कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. १२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळले होते.
या अपघातात विमानात केबिन क्रू म्हणून काम करणाऱ्या दीपक पाठक यांचाही मृत्यू झाला होता. मात्र डीएनए टेस्ट करून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मोठा कालावधी गेला. अखेर अपघाताच्या ९ व्या दिवशी त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. आज दीपक यांचा मृतदेह बदलापूरच्या कात्रप परिसरातील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आला. तिथे बदलापूरकरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गर्दी केली होती.
अंत्यदर्शनानंतर बदलापूरमध्ये दीपक यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील एअर इंडिया विमानाचे पायलट इन कमांड कॅप्टन सुमित सभरवाल, केबिन सुपरवायझर श्रद्धा धवन, क्रू मेंबर अपर्णा महाडिक आणि मैथिली पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.




