१२ आमदार घेऊन बाहेर पडू म्हणणाऱ्या बच्चू कडूंबाबत केसरकर म्हणाले, ‘त्यांच्याबरोबर २ आमदार…’

Dipak Kesarkar on Bacchu Kadu – राज्याच्या राजकारणात २०१९ विधानसभा निवडणुकांपूर्वी व निवडणुकांनंतर झालेले उलटफेर मोठं-मोठ्या राजकीय जाणकारांना देखील चक्रावून सोडणारे ठरले आहेत. विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजप व शिवसेनेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीमधून झालेलं इनकमिंग, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी एकत्र येत स्थापलेली महाविकास आघाडी, ही आघाडी अस्तित्वात येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी, एकनाथ शिंदे यांचा बंड हे या उलटफेरांमधील मैलाचे दगड मानता येतील. गेल्या अडीच ते तीन वर्षांच्या काळात झालेल्या या बड्या उलटफेरांमुळे राज्यात सध्या शिंदे-फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात असलं तरी आणखी काही राजकीय भूकंप घडून येतो का? याबाबत सतत चर्चा सुरु असतात. अशातच आता बच्चू कडू यांच्या एका विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडून येणार का? या चर्चांना हवा मिळाली आहे.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू व राणा दाम्पत्याचा वाद अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. अशातच अपक्ष आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्याबाबत केलेलं एक विधान या वादाच्या आगीत तेल ओतणारे ठरले आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा गंभीर आरोप आमदार रवी राणांनी केला होता. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या रवी राणा यांनी केलेला हा आरोप बच्चू कडू यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. राणांच्या आरोपामुळे रागाने तिळपापड झालेल्या बच्चू कडू यांनी थेट १२ आमदारांसह सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. ‘रवी राणांनी माझ्यावर केलेल्या आरोपांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय घ्यावा’ अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आधीच पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने कडू नाराज असल्याच्या चर्चा होत्या, बच्चू कडू यांनी देखील याबाबत विचारले असता नाराजीच्या चर्चा नाकारल्या नव्हत्या. त्यामुळे बच्चू कडू खरंच सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार का? अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याबाबत आता दीपक केसरकर यांनी भाष्य केलं आहे.
काय म्हणाले केसरकर? | Dipak Kesarkar on Bacchu Kadu
“बच्चू कडू हे जेष्ठ नेते असून, त्यांच्याबरोबर दोन आमदार आहेत. अन्य आमदारांच्यावतीने ते बोलत असतील तर, मला त्यातील वस्तुस्थिती माहिती नाही. लवकरच ते मंत्रीपदी दिसतील, अशी आमची अपेक्षा आहे. जे व्यक्ती मंत्री होणार आहेत, त्यांनी थोड संयम ठेवायला हवा,” असे दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.





