डिंपल यादव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; अखिलेश यांच्यासह मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित

Lok Sabha Election 2024| उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी आज मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अखिलेश आणि त्यांचे काका शिवपाल यादव व समाजवादी पक्षाचे अन्य नेते उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी डिंपल यांनी त्यांचे सासरे मुलायम सिंह यादव यांच्या समाधीवर जाऊन पुष्प अर्पण करून आशीर्वाद घेतले. डिंपल यादव यांच्या उमेदवारीवेळी सपाचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मैनपुरी हा मतदारसंघ समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचा बालेकिल्ला होता. लोकसभेत या मतदारसंघाचे तेच प्रतिनिधीत्व करत होते. आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी डिंपल यांनी सैफई येथे मुलायम सिंह यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले आणि त्यांना पुष्पांजली वाहील्यानंतर अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी नवरात्रीच्या महिन्यानिमित्त आपल्या निवासस्थानी कन्या भोजही करवले आणि आपल्या गावी पत्रक देवी मंदिरात पुजाही केली. Lok Sabha Election 2024|
भारतीय जनता पार्टीने मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून पर्यटन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री जयवीर सिंह यांना उमेदवारी दिली आहे. जयवीर सिंह हे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार असून त्यांच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. जयवीर व त्यांच्या पत्नी कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. दरम्यान, याच मतदारसंघातून बहुजन समाज पक्षानेही आपला उमेदवार रिंगणात उतरवला असल्यामुळे मैनपुरीमध्ये तिरंगी लढत होणार आहे. Lok Sabha Election 2024|
डिंपल यादव यांच्या विरोधात भाजपकडून जयवीर सिंह यांना उमेदवारी
मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून डिंपल यादव यांच्या विरोधात भाजपने जयवीर सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी बसपने आपला उमेदवार बदलला आहे. आता बसपने मैनपुरीतील डॉ. गुलशनदेव शाक्य यांच्या जागी इटावा येथील भरथाना विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले शिवप्रसाद यादव यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे.





