Dimbhe Dam: डिंभे धरण आटले! गतवर्षी १४ टक्के, यंदा अवघा २.५९% साठा; आंबेगाव तालुक्यावर पाणीसंकट
Dimbhe Dam: गतवर्षी १८ जून रोजी डिंभे धरणात १४.८० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता; यंदा मात्र नवीन पाण्याची आवक नसल्याने पातळी खालावली.

Dimbhe Dam – आंबेगाव तालुक्यासह परिसरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणातील पाणीसाठा यंदा अत्यंत कमी पातळीवर पोहोचला आहे. धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली असून गतवर्षीच्या तुलनेत चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.पावसाळा सुरू होऊनही अद्याप पाऊस न झाल्याने धरणातील जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. धरण प्रशासनाकडून उपलब्ध माहितीनुसार, गतवर्षी १८ जून रोजी डिंभे धरणात १४.८० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.
मात्र यावर्षी त्याच दिवशी धरणातील पाणीसाठा केवळ २.५९ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिक आणि जलसंपदा विभागाची चिंता वाढली आहे.गतवर्षी मे आणि जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली होती.यंदा मात्र पाऊस लांबल्यामुळे धरणात नवीन पाण्याची आवक होत नसून उपलब्ध साठाही झपाट्याने कमी होत आहे.
परिणामी आगामी काळात पिण्याचे पाणी, शेती आणि सिंचन व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.हवामान विभागाने येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तविली असली तरी धरणातील पाणीसाठा वाढण्यासाठी पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे मत आहे.
“डिंभे धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे. पावसाळा सुरू असूनही पाऊस झालेला नाही. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यासच धरणातील साठ्यात समाधानकारक वाढ होऊ शकते.”
– गणेश नान्नोर,कार्यकारी अभियंता कुकडी प्रकल्प.




