Dilip Walse Patil : बिबट्याच्या दहशतीवर वळसे पाटील थेट बोलले, प्रशासनाला केले ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

प्रभात वृत्तसेवा
मंचर – आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात बिबट्या-मानवी संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून, या पार्श्वभूमीवर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संवेदनशील आवाहन केले आहे. हा विषय राजकारणाचा नाही, तर सामाजिक आणि मानवी संवेदनशीलतेचा आहे, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले.माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, गेल्या काही दिवसांत अनेक हृदयद्रावक घटना घडल्या असून शेतकरी व पशुधन यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
या दुर्दैवी प्रसंगात राजकारण करण्याऐवजी लोकांच्या दुःखात सहभागी व्हावे आणि संवेदनशीलतेने वर्तन करावे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना बजावले. बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी ‘बिबट्या नसबंदीचा प्रस्ताव’ केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला असून तो कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर या विषयावर वक्तव्य करताना संयम पाळावा, अशी सूचनाही वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना केली. लोकांच्या भावना दुखावतील. असे कोणतेही वक्तव्य टाळावे, असे आवाहन करत त्यांनी प्रशासनाला लोकांच्या सुरक्षेसाठी तत्काळ पावले उचलण्याचेही आवाहन केले.





