Dilip Walse Patil : विकास कामांसाठी सत्ता गरजेची! जिल्हा परिषद-पंचायत समितीसाठी कामाला लागा ; वळसे पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन

प्रभात वृत्तसेवा
मंचर – आंबेगाव तालुक्यातील विविध गावात वाडीवस्तीवर विविध विकास कामे मार्गी लागली आहेत. मात्र, जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्या ताब्यात असेल तर गाव, गावातील वाडी, वस्तीवरील विकास कामे करण्यास गती येईल.त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,असे प्रतिपादन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवार, दि.११ रोजी केले.मंचर (ता.आंबेगाव) येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव शिरूर कार्यकर्ता मेळावाप्रसंगी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते.
कार्यक्रमाला पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील,शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील,पूर्वा वळसे पाटील, गणपतराव इंदोरे,संजय गवारी,सुभाषराव मोरमारे,प्रकाश घोलप, अनिल वाळुंज, वैभव उंडे, प्रा.दत्तात्रय भालेराव,गोविंद खिलारी, मच्छिंद्र गावडे,दौलत लोखंडे, अशोक मोढवे, सुनील बाणखेले, सचिन पानसरे, बाळासाहेब बाणखेले, भगवान वाघ, प्रशांत वाडेकर, दीपक पोखरकर, संतोष सैद, लक्ष्मण बाणखेले, राजूशेठ भंडारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, काही वर्षापूर्वी पक्षातील ४०/४२ आमदारांनी एकत्र येत काहीतरी बदल व्हावा. यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय एका रात्रीत झाला नाही. वरिष्ठ पातळीवर अनेक बैठका झाल्या. त्यानंतर विकास कामे करायची असतील तर सत्तेमध्ये सहभागी व्हावे लागेल.हा विचार मांडून मंत्रिमंडळात सहभागी झालो. विधानसभा निवडणुकीत कमी मताधिक्य पडले. त्यामुळे मला मंत्रिमंडळात घ्या हे सांगण्याचा नैतिक अधिकार मला राहिला नाही. मात्र, पक्षात माझे स्थान अबाधित आहे.
पुढील काळातही चांगल्या पद्धतीने कामे करण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीची सत्ता आपल्या ताब्यात असणे गरजेचे आहे. लोकसभा,विधानसभा निवडणुकीत आपल्याला जरा धक्का बसल्यामुळे आपले कार्यकर्ते शांत झाले आहेत.त्यामुळे विरोधक टीका करतात, चुकीचे आरोप करतात त्याला उत्तर देणे ही कार्यकर्त्याची जबाबदारी असल्याचेही वळसे पाटील म्हणाले. माजी खासदार आणि पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, विरोधकांच्या खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे.
त्यामुळे जनतेने मतदान करताना जो उमेदवार आपल्या गावासाठी तालुक्यासाठी काहीतरी योगदान देईल.विकास कामे करेल त्यालाच मतदान करणे गरजेचे आहे.शिरूर लोकसभा मतदारसंघात पूर्वीची काही कामे झाले आहेत.त्या कामाचा मी पाठपुरावा केला आहे.रेल्वे प्रकल्प, खेड सिन्नर रस्ता यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला असून या बहाद्दराने काही केलं नाही ते फक्त नारळ फोडण्याचे काम करतात.अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांचे नाव न घेता आढळराव पाटील यांनी केली. बाजार समितीचे सभापती निलेश थोरात आणि मयूर सरडे यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र करंजखेले यांनी आभार मानले.
सरपंच विजय गावडे राष्ट्रवादीत..
यावेळी गावडेवाडीचे सरपंच विजय गावडे आणि त्यांच्या सहकाऱ्र्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र करंजखेले यांची तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, विष्णूकाका हिंगे पाटील,अरुण गिरे, प्रवीण पारधी,सरपंच विजय गावडे इत्यादींची भाषणे झाली.




