Dilip Walse Patil: आई-वडिलांना विसरू नका! सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यात माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांचे भावूक आवाहन
Dilip Walse Patil: तरुण पिढीने आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवावी; सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या थोरात कुटुंबाचे वळसे पाटलांकडून कौतुक.

Dilip Walse Patil – संस्कार, कष्ट आणि त्यागाच्या बळावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कुटुंबाचा प्रवास पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. कष्ट हेच जीवनाचे खरे भांडवल मानून सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा, असे प्रतिपादन माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. वाघाळे (ता. शिरूर) येथील उद्योजक व श्री महागणपती करिअर ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष विजय भानुदास थोरात व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने माता-पित्यांचे परमपूज्य कमलताई भानुदास थोरात व भानुदास लहानु थोरात या आई-वडिलांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा,
माता-पिता पूजन सोहळ्याच्याfकार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काकासाहेब पलांडे, पोपटराव गावडे, मानसिंग पाचुंदकर, प्रकाश पवार, बालाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदाशिव पवार, प्रतिभा पाचपुते, राजेंद्र गावडे, राजेश लांडे, माणिकराव खेडकर, विश्वास कोहोकडे, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर व हितचिंतकांचे थोरात कुटुंबीयांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमापूर्वी ह.भ.प. इंदुरीकर महाराज देशमुख यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन झाले. कीर्तनातून संस्कार, कुटुंबव्यवस्था, आई-वडिलांचा सन्मान आणि सामाजिक जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. वळसे पाटील म्हणाले की, संस्कार, कष्ट, त्यागाच्या जोरावर उभे राहिलेले हे कुटुंब समाजासाठी आदर्शवत आहे. शून्यातून विश्व निर्मिती करणाऱ्या या कुटुंबाचा प्रवास पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
गावाच्या विकासासाठी पाणीपुरवठा योजना राबविणे, सामाजिक बांधिलकी जपणे, समाजहिताचे कार्य करणे हीच खरी समाजसेवा आहे. संपत्तीपेक्षा संस्कार व शिक्षण अधिक महत्त्वाचे असून तरुण पिढीने आई-वडिलांचा सन्मान व सांभाळ करण्याचे कर्तव्य विसरू नये. आई-वडिलांना विसरू नका, त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवा,” असा भावनिक संदेशही त्यांनी यावेळी दिला.
महावितरणचे विभागीय कार्यालय सुरू करा
वळसे पाटील म्हणाले, शिरूर तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या महावितरणच्या विभागीय कार्यालयाची स्थापना शिरूर येथे करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक, शेतकरी व उद्योजकांना वीजविषयक कामांसाठी मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.





