Dilip Walse Patil : बिरसा मुंडा यांचा संघर्ष हा स्वातंत्र्यलढ्याचा एक तेजस्वी अध्याय – माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

प्रभात वृत्तसेवा
मंचर – आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, त्यांच्या जमीन आणि स्वाभिमान रक्षणासाठी बिरसा मुंडा यांनी उभारलेला संघर्ष हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा एक महत्त्वाचा आणि तेजस्वी अध्याय मानला जातो.असे प्रतिपादन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवार, दि.१५ रोजी व्यक्त केले.भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक, आदिवासी समाजाचे प्रेरणास्रोत आणि अन्यायाविरुद्ध लढणारे शूर योद्धा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालय, मंचर येथे त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नवनाथ हुले,कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे आंबेगाव तालुक्याचे माजी अध्यक्ष प्रा.अरुण गोरडे,पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष भोर, उद्योजक रामदास घोलप, सरपंच नवनाथ निघोट, माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील, विजय थोरात,सावित्राशेठ थोरात, बाळशीराम ढोमे, निवृत्तीशेठ बोंबे, उद्योजिका ज्योती गोरडे आदीं मान्यवर उपस्थित होते.
भगवान बिरसा मुंडा यांची विचारधारा आणि त्यांचे त्यागमय जीवन हे केवळ आदिवासी समाजाच्याच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या उन्नतीसाठी आणि समानतेवर आधारित भारताच्या निर्मितीसाठी सदैव उज्ज्वल मार्ग दाखवत राहील.असे मत यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना आदराने नमन केले.





