Pune District : जेजुरीच्या अपघातातील जखमींना दिलीप वळसे पाटलांकडून मदत

पेठ : जेजुरीजवळ झालेल्या अपघातातील जखमींना माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मदतीचा हात दिला आहे. सोमवार, दि. ३० डिसेंबर रोजी पहाटे अडीच वाजता आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी गावातील ११ जण व खेड तालुक्यातील पाच जण सोमवती अमावस्यानिमित्त जेजुरी येथे देवदर्शन चालले असताना जेजुरीजवळ या मिनी टेम्पोला अपघात झाला. या अपघातात आशाबाई बाळकृष्ण जरे, ही महिला जागीच ठार झाली व वाहन चालक जितेंद्र ज्ञानेश्वर तोत्रे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित १४ जणांना जेजुरी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
प्राथमिक उपचार झाल्यानंतर सर्व जखमींना पिंपरी चिंचवड येथील वाय सी एम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. यावेळी दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटलांना अपघाताची माहिती दिल्यानंतर त्यांनी जेजुरी ते खाजगी दवाखान्यात झालेला खर्च निम्मा करण्यास डॉक्टरला भाग पाडले आणि त्यानंतर वाय सी एममध्ये आरोग्य अधीक्षक यांना फोनद्वारे माहिती दिल्यानंतर सर्व १४ जणांना वेळीच उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचले.
त्यापैकी अनुष्का जितेंद्र तोत्रे या मुलीचा दोन्ही पाय फ्रॅक्चर असल्याने तिला व तिच्या आईला भोसरी येथील साईनाथ हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल केले. काल अनुष्कावर दोन्ही पायांची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. साईनाथ हॉस्पिटलमधील सर्व खर्च वळसे पाटील यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. वाय सी एममधील सुद्धा अतिरिक्त खर्च वळसे पाटील यांच्या कार्यालयातून करण्यात येणार आहे, अशी माहिती रामदास वळसे पाटील यांनी दिली.
भोसरी येथील वाय सी एममध्ये मंगल ज्ञानेश्वर तोत्रे या महिलेची सुद्धा बरगडीची शस्त्रक्रिया करण्यात आली व सर्व जखमींना उपचार सध्या सुरू आहेत. अपघाताची माहिती गावातील ग्रामस्थांना कळल्यामुळे तातडीने उपसरपंच जितेंद्र तोतरे,कैलास तोत्रे, विकास बारवे, तुषार तोतरे, प्रतीक तोतरे, अनिल तोतरे, रवींद्र तोतरे, दिलीप तोत्रे व संदीप तोत्रे आधी ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली, सर्व जखमींची व्यवस्था पाहिली. या भेटी दरम्यान तालुका पंचायत समिती उपसभापती संतोष भोर आदी उपस्थित होते.





