पिंपरी | निगडीतील लिंगायत दफनभूमीची दुरवस्था

पिंपरी, (प्रतिनिधी) – निगडीतील लिंगायत समाजाची दफनभूमीची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे वाढली असून दफनभूमीची दुरवस्था झाली आहे. दफनभूमीची दुरुस्ती करुन द्यावी, अशी मागणी करुनही महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी केला आहे.
सध्या दफनभूमीमध्ये सोयी-सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. परिणामी नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी दुरुस्ती करून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी वेळोवेळी केला आहे.
मोरवाडी येथील शिवकैलास दफनभूमी लोकसंख्येच्या मानाने पुरेसी नाही. याकरिता नवीन प्रशस्त व सर्व सोयीने युक्त असे दफनभूमीची मागणी आयुक्तांकडे केली आहे. तरी, आजतागायत त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. दफनभूमीची दुरुस्ती देखील केली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात गेल्या दोन वर्षापासून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. जनसंवाद सभेत सुद्धा अनेकदा हा विषय मांडला आहे. परंतु, प्रशासनाकडून तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. त्यामुळे त्या ठिकाणी दफन करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. पर्यायाने परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे, अशी खंत शिवानंद चौगुले यांनी व्यक्त केली आहे.





