Bhor : महसूल मंडलाधिकारी कार्यालयाला जीर्ण झाडाचा धोका
Bhor : हे पिंपळाचे झाड जुने असून, मुसळधार पाऊस किंवा वादळी वाऱ्यामुळे झाडाची मोठी फांदी तुटून पडल्यास किंवा झाड कोसळल्यास मोठी जीवित व वित्तहानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने या झाडाची पाहणी करून धोकादायक फांद्यांची छाटणी करावी, अशी मागणी नागरिक व शेतकऱ्यांकडून होत आहे.

भोर : भोर शहरात पंचायत समितीच्या शेजारील महसूल मंडलाधिकारी व तलाठी कार्यालयाच्या इमारतीवर पिंपळाच्या झाडाच्या मोठ्या फांद्या झुकल्याने इमारतीला व तेथील कर्मचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. झाडाच्या फांद्या इमारतीच्या छतावर आणि परिसरावर पसरल्या असून, एखादी दुर्घटना घडल्यास कार्यालयात उपस्थित असणारे महसूल कर्मचारी तसेच कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या जीवास मोठा धोका निर्माण झाला आहे.
या महसूल विभागाच्या भव्य इमारतीमध्ये ३ मंडलाधिकारी व ४ तलाठी यांचे कामकाज चालते. शासकीय सुट्ट्या वगळता दररोज येथे शेकडो नागरिक व शेतकरी विविध महसूल कामांसाठी येत असतात. तसेच कार्यालयाच्या समोरच अनेक दुचाकी वाहने पार्क केलेली असतात. कार्यालयाच्या संपूर्ण छतावर या झाडाचा भार पडत असल्याने इमारतीच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हे पिंपळाचे झाड जुने असून, मुसळधार पाऊस किंवा वादळी वाऱ्यामुळे झाडाची मोठी फांदी तुटून पडल्यास किंवा झाड कोसळल्यास मोठी जीवित व वित्तहानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने या झाडाची पाहणी करून धोकादायक फांद्यांची छाटणी करावी, अशी मागणी नागरिक व शेतकऱ्यांकडून होत आहे. दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य धोका टाळण्यासाठी वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. दरम्यान, या विषयाबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
हे जुने झाड कार्यालयासाठी धोकादायक ठरत असल्याचे उघड दिसत असतानाही नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. धोकादायक झाडांची छाटणी करण्याऐवजी नगरपालिका कोणत्याही प्रकारचा धोका नसलेल्या झाडांची तोड करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गणेशोत्सवापूर्वी शहरात कोणताही धोका नसतानाही ६ मोठी झाडे नगरपालिकेने तोडली होती, याकडेही स्थानिकांनी लक्ष वेधले आहे.





