Digital Farming | पिवळा खोडकीडा ते करपा ; ‘क्रॉपसॅप’ कसे वाचवतंय शेतकरी अर्थकारण?

प्रभात वृत्तसेवा
पवन मावळ – भात उत्पादनात अग्रेसर असलेल्या मावळ तालुक्यात शेतकऱ्यांना कीड व रोगामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) मावळ तालुक्यात सुरू करण्यात आला आहे.तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी सांगितले की, मागील काही वर्षांत भात पिकावर पिवळा खोडकीडा, गादमाशी, लष्करी अळी, तुडटुडे, निळे भुगेंरे, हिस्पा, पानावरील करपा, पर्णकोष करपा व जीवाणूजन्य करपा यांसारख्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.या योजनेअंतर्गत प्रत्येक सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना फिक्स प्लॉट तर उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांना रँडम प्लॉटचे निरीक्षण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवडलेल्या १०४ प्लॉटवर पाच कामगंध सापळे बसविण्यात आले असून त्याद्वारे कीड व रोगाची माहिती संकलित केली जात आहे.
ही माहिती एम क्रॉपसॅप मोबाईल ऍपवर टाकून, शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य औषध फवारणीसाठी सल्ला दिला जात आहे.उप कृषी अधिकारी विकास गोसावी व सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय ढुमणे यांनी सांगितले की, या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वेळोवेळी कीड-रोग नियंत्रणाविषयी मार्गदर्शन मिळणार असून उत्पादनात वाढ होणार आहे.
प्रकल्पाचा उद्देश-
शेतकऱ्यांमध्ये कीड व रोगांची ओळख निर्माण करणे, त्यांना प्रशिक्षित करुन पिकांवरील कीड आणि रोगांचे वेळीच व्यवस्थापन करणे. रोगांमुळे होणाऱ्या प्रादुर्भावाबाबत जागरूकता निर्माण करणे व पुढील संभाव्य नुकसान टाळून उत्पादनात वाढ करणे. पिकांचे सर्वेक्षण करून हंगाम निहाय प्रमुख कीड रोगांच्या प्रादुर्भावाबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीव निर्माण करणे सोबतच त्यांना उपाययोजना सुचविणे. कीड रोग प्रादुर्भावित क्षेत्रासाठी आपत्कालीन परिस्थितीत पीक संरक्षण औषधे उपलब्ध करून देणे.
“शेतकऱ्यांमध्ये किड व रोगाची ओळख निर्माण करणे, वेळीच व्यवस्थापन करून संभाव्य नुकसान टाळणे व उत्पादनात वाढ करणे, हा क्रॉपसॅप प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.”
– आर.पी. गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी, काळेकॉलनी
“मावळ तालुक्यात क्रॉपसॅप योजने अंतर्गत १०४ फिक्स प्लॉट निवडले असून मोबाईल अॅपद्वारे सर्वेक्षण करून कीड व रोग नियंत्रण व औषध फवारणी मार्गदर्शन केले जात आहे.”
– मारुती साळे, तालुका कृषी अधिकारी, मावळ





