Digital Arrest – शहरातील डिजिटल अरेस्ट प्रकरणात सायबर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एका लोकप्रिय रिल स्टारचा शोध सुरू आहे. या प्रकरणात त्याच्या मैत्रिणीचीही चौकशी केली असून तिला नोटीस बजावली आहे. दरम्यान, या प्रकरणात चीन कनेक्शन आढळले आहे. डिजिटल अरेस्टची भीती दाखवत एका ज्येष्ठाला पावणे अकरा कोटीला फसवल्याच्या प्रकरणात कर्वेनगरमधील बी टेकचा विद्यार्थी हर्षद सुभाष धंतोले ( २३) आणि समर्थ सुरेश देशमुख ( २४) यांना २२ फेब्रुवारी रोजी अटक केली. दोघेही ऑनलाइन फसवणुकीत सहभागी आहेत. वर्षाच्या सुरुवातीला भांडारकर रोड येथील ८२ वर्षीय ज्येष्ठाला सीबीआय अधिकाऱ्यांच्या नावाने धमकावून तब्बल १०.७५ कोटी रुपयांची फसवणूक केली त्यांनी बनावट मनी लॉन्डरिंग प्रकरण दाखवून वृद्धाला डिजिटल अरेस्टमध्ये असल्याचे सांगितले. व्हर्च्युअल कोर्टरूम तयार करून कायदेशीर मदतीचे आमिष दाखवले आणि विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.निवृत्तीनंतर साठवलेली आयुष्यभराची बचत आणि मुदतठेवींची रक्कम आरोपींनी लाटली. रिल स्टार फरार वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या माहितीनुसार धंतोले आणि देशमुख यांच्या अटकेनंतर तपासात एका लोकप्रिय रिल स्टारचा सहभाग समोर आला. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात त्याचे व्हिडीओ लोकप्रिय आहेत. तपासातील मनी ट्रेलनुसार, मोठी रक्कम रिल स्टारच्या बँक खात्यात जमा झाल्याचे आढळले. तो मुख्य संशयितांच्या संपर्कात होती. त्यांच्या सूचनेनुसार म्युल अकाउंट्स (बनावट/भाड्याने घेतलेली बँक खाती) गोळा करण्याचे काम करत होता. छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवडमध्येही शोध घेतला. मात्र तो अद्याप फरार आहे. तपासादरम्यान काही रक्कम एका तरुणीच्या खात्यात जमा झाल्याचे आढळले. चौकशीत ती रिल स्टारची मैत्रीण असल्याचे समोर आले. तीही सोशल मीडियावर मनोरंजन, कॉमेडी व्हिडीओ बनवते. पोलिसांनी तिला नोटीस दिली आहे. ती व्हिडीओमध्ये विविध ऑनलाइन फिल्टर्स वापरून चेहरा बदलत असे, यामुळे तिची ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. चीन कनेक्शन पोलिसांनी सांगितले की, तपासात काही संशयितांचे चीन आणि हाँगकाँगमधील हँडलर्सशी संपर्क असल्याचे आढळले. फसवणुकीतील काही रक्कम क्रिप्टोकरन्सीरूपांतरित करून परदेशात पाठवण्यात आल्याचेही समोर आले आहे. आरोपींच्या मोबाईल तपासणीतून ही माहिती उघड झाली. पैसे एका क्रिप्टो एक्सचेंजमार्फत चिनी क्रिप्टो प्लॅटफॉर्मवर वळवल्याचा संशय आहे.