विरोधामुळे विकासकामांना अडचणी – संदीप वाघेरे

पिंपरी – माझ्या प्रभागात मी 30 हजार रोपांची लागवड केली. मात्र, मला साधे वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्यही केले नाही. इतर समित्या तर सोडा. मला का पद दिले नाही हे त्यांनाच विचारा. तसेच विकासकामे करताना स्वपक्षातील विरोधामुळे अनेक अडचणी आल्या, असे भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी सांगितले.
दै. प्रभातच्या पिंपरी कार्यालयात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या वेळी गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर ते डिजिटल प्रभातशी बोलत होते. वाघेरे म्हणाले, “”दोन स्थायी समिती अध्यक्ष पिंपरीतील झाले. मात्र प्रभागाचा विकास झाला नाही. 2017 मध्ये मी निवडून आल्यावर अभ्यास करून 185 कोटी रुपयांची 17 विकासकामे पहिल्या वर्षासाठी निश्चित केली. यामध्ये पिंपरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाण पूल, पिंपळे सौदागर उड्डाण पूल, दोन स्मशान भूमी, उद्याने, क्रीडांगणे, रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण, पाण्याची टाकी, स्थायी समितीमध्ये ही कामे मंजूर होऊन महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे पाठविली.
मात्र स्वपक्षातील नेत्यांनी खोडा घातल्यामुळे 16 कामे नाकारली. पक्षातील वरिष्ठ नेत्याने कटकारस्थान केल्यामुळे ही कामे नाकारली गेल्याचे मला समजले. माझ्या विरोधातील नेते आणि आमचे वरिष्ठ नेते यांचे घनिष्ठ मैत्री संबंध असल्याने ही कामे नाकारण्यात आली. मी आक्रांडतांडव केल्याने उपसूचनेद्वारे ही कामे मंजूर करून घेतली मात्र नंतर ती पुन्हा नाकारली. संघर्ष हा आपल्या पाचवीलाच पूजला आहे. हे समजून काम करीत राहिलो.
नाकारलेली ही कामे मंजूर करून घ्यायला चार-पाच वर्षे लागले. मी चुकीच्या माणसांसमोर झुकत नाही. केवळ आई-वडील आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक होतो. दुसऱ्याने केलेल्या कामाचेही श्रेय मी घेत नाही.”
स्वपक्षातूनच माझी कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय क्षेत्रात माहिती आहे. त्यामुळे इतर पक्षातून मला अनेक ऑफर आल्या आहेत. एवढेच नव्हे तर आमच्या पक्षातील काही अतिवरिष्ठ नेत्यांनीही माझ्याशी चर्चा करून तुम्ही कुठेही इतर पक्षात जाऊ नका, असे सांगितले आहे. त्यामुळे मी सध्या कोठेही गेलेलो नाही. दुसऱ्या पक्षातून आलेल्या ऑफरबाबत कार्यकर्ते व मित्र मंडळींशी चर्चा करून निर्णयही घेणार आहे, असेही माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी सांगितले.





