आहारशास्त्र : लहान मुलांमधील ताप आणि आहार

लहान मुलांमध्ये ताप येणे तसे नेहमीचे; सगळ्यांच्या परिचयाचे. नेहमी शहाण्यासारखी वागणारी, हसरी आणि खेळकर मुलं ताप आला की मलूल होतात, किरकिरी होतात, खात-पित नाहीत. अशावेळी त्यांना खायला काय द्यावे हा आई-बाबांसमोर मोठा प्रश्‍न असतो. अन्न केवळ पोट भरायचे काम करत नाही, तर आजारपणातून बाहेर पडण्यासाठीही मदत करत असते. त्यामुळे ताप आला असताना योग्य आहार घेतला तर ताप कमी व्हायला तर मदत होतेच शिवाय तापाचे दुष्परिणामही कमी करायला आणि टाळायला मदत होते.

खरंतर ताप हा आजार नाही, ते शरीरातील एखाद्या आजाराचे लक्षण आहे. आपल्या शरीराची एखाद्या आजाराशी किंवा जंतुसंसर्गाशी लढा देण्याची ती एक व्यवस्था आहे. तापात शरीराचे तापमान वाढते. या वाढलेल्या तापमानात शरीरात शिरलेले जंतू तग धरू नयेत हा त्यामागचा हेतू. पण या तापमान वाढवायच्या आणि जंतूंशी लढा देण्याच्या प्रक्रियेदरम्यान शरीरातील बरीच ऊर्जा खर्च होते.

यामुळे ताप आला असताना शरीराची ऊर्जेची गरज वाढते. पण तापात नेमकी भूकही कमी झाली असते, तेव्हा अशावेळी थोड्याच प्रमाणात आहार देऊनही त्यातून जास्तीत जास्त ऊर्जा कशी मिळेल, हे पहावे लागते. शिवाय वाढलेल्या तापमानात शरीरातील पाणी खूप जास्त वापरले जाते, घामावाटेही पाणी शरीराबाहेर पडते. त्यामुळे पाण्याची व द्रवपदार्थांची गरज वाढते.

शरीरातील प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी प्रथिनयुक्‍त आणि जीवनसत्वांनी संपन्न आहारही घ्यावा लागतो. ही तारेवरची कसरत सांभाळता आली नाही तर तापामध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे (डिहायड्रेशन), खूप थकवा येणे, वजन कमी होणे असे दुष्परिणाम दिसू शकतात. लहान मुलांमध्ये हे दुष्परिणाम तुलनेने लवकर आणि जास्त तीव्रतेचे दिसून शकतात. हे टाळायचे असेल तर लहान मुलांना ताप आला असताना आहारात काय द्यावे याबद्दल सर्व पालकांना माहिती हवीच!

मुलांना ताप आला असताना आहारात घ्यायची काळजी

ताप आला असताना एकदाच खूप खायला देण्याऐवजी ते थोडे थोडे विभागून द्या.
तापात घरी केलेले, साधे, पचायला सोपे अन्न द्या. तेलकट, तूपकट, मसालेदार, अति-गोड पदार्थ देणे टाळा. पॅकबंद पदार्थ पूर्णपणे टाळा.

पोळी, भाकरी यासारख्या कोरड्या पदार्थांपेक्षा मूग आणि तांदळाची मऊ खिचडी, मेतकूट-भात, दहीबुत्ती, दलिया खिचडी, तांदळाची/ज्वारीची/नाचणीची उकड, भाज्या घालून केलेला उपमा, वरईचा भात, रव्याची/राजगिऱ्याची/सातूची/नाचणीची खिर असे खायला (गिळायला) सोपे पदार्थ निवडा.

मनुके, अंजीर, जरदाळू, खजूर यांसारखा सुकामेवा मुलांना द्या. च्यवनप्राश, गुलकंद, दाण्याचा/अळिवाचा/नाचणीचा लाडू द्या. यातून थोड्या प्रमाणात खाऊनही जास्त उर्जा मिळेल.

तापाबरोबर अतिसार नसेल तर प्रथिनांसाठी आहारात उकडलेली अंडी, ऑमलेट, मऊ शिजवलेला मासा, दूध, शिजवलेले मऊ पनीर यांचा समावेश करता येईल.
मऊ भातावर, अथवा खिचडीवर एखादा चमचा तूप घ्यायला हरकत नाही. पण आहारात तेल-तूप-लोण्याचा अतिवापर टाळा.

ताप असताना पचनशक्ती कमी झाली असल्यामुळे कच्चे सॅलड, कोशिंबीरी, पचडी, भाज्यांच्या स्मूदीज, कच्ची मोडाची कडधान्ये देणे टाळा. तापात पाण्याची व द्रवपदार्थांची गरज नेहमीपेक्षा जवळपास दुपटीने वाढते. ही वाढलेली गरज भरून काढण्यासाठी तापात दर तासाला पाणी किंवा इतर द्रवपदार्थ द्या. पाणी उकळून ठेवा. गरम पाणी घशाला बरे वाटते. त्यामुळे प्यायला देताना जरा कोमट किंवा गरम पाणी द्या. इतर द्रव पदार्थांमध्ये काढा, नारळ पाणी, ताजे ताक, भाज्यांचे पातळ सूप, मूगाचे कढण, कोकम सार, हुलग्याचे सूप, चिकनचे सूप यांचा समावेश करा. चिकन सूपने प्रतिकारशक्ती वाढेल तर कोकम साराने भूक वाढायला, औषधांमुळे होणारी ऍसिडीटी कमी व्हायलाही मदत होईल.

तापाबरोबर उलट्या किंवा अतिसार असेल तर द्रवपदार्थांची आणि काही खनिजद्रव्यांची गरज अजूनच वाढते. अशावेळी वरील द्रवपदार्थांबरोबरच इलेक्‍ट्रॉल/ यांचीही मदत घ्यावी लागते. पण अशावेळी डॉक्‍टरांचा सल्ला नक्की घ्या.
स्तनपान घेणाऱ्या बालकांना तापात नेहमीपेक्षा जास्त वेळा, बाळे मागतील तेव्हा स्तनपान द्या. तापाबरोबर अतिसार असला तरी स्तनपान बंद करू नका.

ताप आला की दही-ताक द्यायचे नाही, फळे द्यायची नाहीत अशी अनेकांची धारणा असते. पण यात तथ्य नाही. खरं तर दुधापेक्षा दही, ताक पचायला सोपे. घरी लावलेले, ताजे दही, दही-भात, ताक किंवा कढी यांचा आहारात समावेश करता येईल. घसा दुखत असेल तर आंबट फळे टाळा; कारण यामुळे घशाची चुरचुर होईल.

पण चांगली पिकलेली, ज्या त्या सिझनमध्ये उपलब्ध असलेली फळे विशेषत: चिक्कू, पपई, डाळिंब, गोड मोसंबी, ड्‍रॅगनफ्रूट, पिकलेले केळे, पेअर, खरबूज खायला काहीच हरकत नाही. फळांमधील अ आणि क जीवनसत्व प्रतिकारशक्तीही वाढवेल. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात अक्रोड, बदाम, मगज बी, जवस यांचाही समावेश करा.

तापामध्ये खालील पदार्थांचा स्वयंपाकात सढळ हस्ते वापर करा

हळद
हळद तर जंतूनाशक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे जंतुसंसर्गाला पळवून लावायला हळद मदत करेल. गरम दूधातून हळद देता येईल, काढ्यामध्ये हळद घालता येईल, मूगडाळीच्या खिचडीत/वरणात हळद जास्त प्रमाणात वापरता येईल आणि गुळण्या करण्याच्या पाण्यात मिठाबरोबर चिमूटभर हळदही घालता येईल.

आले
आलेसुद्धा जंतूंविरोधी काम करते आणि सर्दी-खोकला-ताप या त्रिकुटामध्ये फायदेशीर ठरते. आलेपाक, आल्याचा काढा, भरपूर आले घालून केलेली कढी यातून आले पोटात जाईल. अगदी रोजच्या भाजीत, भाज्यांच्या सूपात, उपम्यात किंवा मूगाच्या वरणात/खिचडीतही आले किसून घालता येईल.

ओवा
ओवा पचनाला मदत करतो, भूक वाढवतो. तापात तोंडाची गेलेली चव ओवा परत आणतो! त्यामुळे पोळीच्या कणकेत, पराठ्यात, भातात, सूपात, जमेल तिथे ओवा वापरा. दोन जेवणांच्या मध्ये देखील चिमूटभर ओवा (भाजलेला) तोंडात टाकता येईल.

कडीपत्ता, पुदिना, तुळस, गवती चहा
ही घरोघरी बागेत दिसणारी छोटी-छोटी झुडुपे म्हणजे खरंतर औषधी गुणधर्मांचा खजिनाच. ताप आला असताना तुळस पुदिना आले व मध यांचे चाटण देणे उत्तम! जेवणाबरोबर कडीपत्त्याची खमंग चटणी असेल तर मुले नक्कीच दोन घास जास्त खातील! काढ्यामध्ये तुळस, गवतीचहा, पुदिना वापरता येईल. तापात खायचा आग्रह करू नका. भूक नसल्यास थोड्या वेळाने खायला द्या, आवडीचे घरगुती पदार्थ द्या. आजारपणात आग्रहाने किंवा बळजबरी खायला घातल्यास उलटी/मळमळ होऊ शकते.

तापात मूल काहीच खात-पित नाही, मुलाचे वजन कमी होतेय, खूप अशक्‍तपणा आहे, खूप जास्त आणि सारखाच ताप येतोय, उलट्या-जुलाब सुरु आहेत, लघवी होत नाही, डोळे खोल गेलेत, मूल ग्लानीत आहे अशी लक्षणे दिसायला लागताच, कोणतेही घरगुती उपाय न करता डॉक्‍टरांचा सल्ला घ्या.

तापामध्ये पुरेशी विश्रांती घेणेही महत्वाचे. गोळ्या घेऊन ताप उतरल्यावर बरीच मुले लगेच खेळायला, पळायला लागतात. शाळा-क्‍लासेस सुरू करतात. पण बऱ्याचदा हा ताप गोळ्यांमुळे तात्पुरता उतरला असतो. तो परत चढायची शक्‍यता असते. त्यामुळे तापाच्या गोळ्या बंद होईपर्यंत आणि शरीरातील जंतूसंसर्ग पूर्णपणे जाईपर्यंत विश्रांती आणि वर सुचविल्याप्रमाणे आहार घेणेच श्रेयस्कर!

-डॉ. तेजस प्रज्ञा यशवंत

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.