Satara | स्वतःसह उप अधीक्षकांच्या अंगावर ओतले डिझेल

कोरेगाव (प्रतिनिधी) – साठेवाडी, ता. कोरेगाव येथे मंजूर झालेल्या घरकुलाच्या जागेची मोजणी करून देण्याच्या मागणीसाठी कोरेगावच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मंगळवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास उत्तम व्यंकट मोरे याने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेऊन पेटवून देण्याची धमकी दिली,
त्याचबरोबर उप अधीक्षक लता घरात यांच्या अंगावर डिझेल ओतून ढकलून देत शिवीगाळ व दमदाटी केली. या घटनेमुळे कोरेगावात खळबळ उडाली असून प्रशासकीय यंत्रणेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, साठेवाडी येथील मुक्ताबाई दादा मोरे यांना घरकूल मंजूर झाले आहे.
या घरकुलाच्या जागेची मोजणी करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयास पत्रव्यवहार केला होता, मात्र या कार्यालयाकडून संबंधित जागेचा सातबारा उतारा व लेआउट पाहिल्यानंतर कमी जास्त पत्रक झाले नसल्याची खातरजमा झाली.
त्यामुळे मोजणी करता येणार नसल्याचे पत्र भूमि अभिलेख विभागाकडून गटविकास अधिकारी कार्यालयात देण्यात आले होते.
त्या मंगळवार, दि. २४ सप्टेंबर रोजी कोरेगाव येथील दिवाणी न्यायालयात दुपारी साक्ष नोंदविण्यासाठी हजर रहायचे असल्याने उप अधीक्षक लता घरत या दालनातून बाहेर पडत असताना दालनाजवळ मुक्ताबाई दादा मोरे या उत्तम मोरे आणि सुमित मोरे यांच्यासमवेत तेथे आल्या.
उत्तम मोरे हे दालनामधील खुर्चीवर जाऊन बसले असता, घरत यांनी मी न्यायालयात साक्ष देण्याकामी चालले आहे, तेथून आल्यानंतर तुमच्याशी बोलते असे सांगून त्यांना बाहेर जाण्यास सांगितले.
मात्र उत्तम मोरे याने मुक्ताबाई मोरे यांच्या कामाचा काय तो आत्ताचा आत्ता निकाल लावा, असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
ही बाई कुठल्या कामाकडे लक्ष देत नाही, असे म्हणत हातात असलेल्या प्लास्टिकचा कॅन बाहेर काढून लता घरात यांच्या दिशेने गेला, केबिनमध्ये आमचे काम केल्याशिवाय जायचे नाही, तू जर बाहेर गेलीस तर मी स्वतःला पेटवून घेईल, अशी धमकी देत कॅनमधील डिझेल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले व घरत यांच्या अंगावर टाकले.
खिशातील काडीपेटी काढून मी स्वतःला पेटवून घेतो, असे म्हणू लागला. मुक्ताबाई मोरे व सुमित मोरे या दोघांनी लता घरात यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. हा प्रकार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहिला, त्यांनी सर्वांना बाजूला केले.
याप्रकरणी लता घरात यांनी फिर्याद दिली. कोरेगाव पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुक्ताबाई दादा मोरे, उत्तम व्यंकट मोरे आणि सुमित पद्माकर मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने तपास करत आहेत.





