Maharashtra Politics : दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल्ल पटेल यांची भेट? नेमकं पडद्याआड काय सुरूऐ? चर्चांना उधाण
Maharashtra Politics : सूत्रांच्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात दिल्लीत सुमारे ३५ मिनिटे चर्चा झाली.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र, विलिनीकरणाऐवजी स्वतंत्र गटाने सत्तेत सहभागी होण्याच्या पर्यायाचीही चाचपणी केली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला असून, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात दिल्लीत बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात दिल्लीत सुमारे ३५ मिनिटे चर्चा झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
दरम्यान, मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी आमदारांना शरद पवारांकडून फोन येत आहेत का, अशी विचारणा केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये पडद्यामागे काही हालचाली सुरू आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुसरीकडे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी अद्याप विलिनीकरणाच्या चर्चांना अधिकृत दुजोरा दिलेला नाही. या संदर्भात जो काही निर्णय घेतला जाईल, तो सुनेत्रा पवार घेतील आणि त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल, अशी भूमिका काही आमदारांनी मांडली आहे. त्यामुळे विलिनीकरणाचा विषय अद्याप पूर्णपणे संपुष्टात आलेला नसल्याचे चित्र आहे.
याशिवाय पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवरून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याची माहितीही समोर आली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद वाढत असल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
एकीकडे दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चा, दुसरीकडे स्वतंत्रपणे सत्तेत सहभागी होण्याचा पर्याय आणि त्यातच बड्या नेत्यांच्या गुप्त बैठका, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय घडतंय, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या सर्व घडामोडींवर सुनेत्रा पवार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Satara: ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी घेतली ना. एकनाथ शिंदें यांची भेट





