Anuradha Paudwal : लता मंगेशकर यांच्यामुळे संपलं करिअर? अखेर अनुराधा पौडवाल यांनी मौन सोडलं, “मला पुढे जाऊ दिलं नाही….”
अनुराधा पौडवाल यांनी 1973 मध्ये आपल्या संगीत कारकिर्दीची सुरुवात केली. 1980 आणि 1990 च्या दशकात त्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली

Anuradha Paudwal | Lata Mangeshkar : भारतीय संगीतविश्वात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची तुलना अनेक वर्षांपासून होत आली आहे. एक काळ असा होता की अनुराधा पौडवाल यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्या लतादीदींना पर्याय ठरतील, अशीही चर्चा रंगली होती.
त्यानंतर त्यांच्या करिअरमध्ये आलेल्या चढ-उतारांमुळे एक वाद कायम चर्चेत राहिला, ‘लता मंगेशकर यांनी अनुराधा पौडवाल यांना पुढे जाऊ दिलं नाही.’ या चर्चेवर अनेक वर्षे विविध तर्क-वितर्क मांडले गेले, पण स्वतः अनुराधा पौडवाल यांनी याबाबत कधीही स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. आता अनेक वर्षांनंतर त्यांनी या वादावर पहिल्यांदाच मनमोकळं भाष्य करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (Anuradha Paudwal)
एका पॉडकास्ट मुलाखतीत बोलताना अनुराधा पौडवाल यांनी लता मंगेशकर यांच्याबद्दलचा आपला आदर व्यक्त करत या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, “गुरूंची बरोबरी कोणीच करत नाही, असं मी मानते. गुरूंना फॉलो केलं जातं, त्यांची पूजा केली जाते. मला त्यांच्याकडून जितकं शिकता आलं, तितकं मी शिकले.”
त्यानंतर त्या पुढे म्हणाल्या, “लोकांचे विचारच असे असतात की ते सतत तुलना करतात. त्यामुळे ‘लतादीदींनी मला पुढे जाऊ दिलं नाही’, अशी कथा लोकांना खूप मसालेदार वाटते. पण लतादीदींची कला ज्या शिखरावर होती, त्या शिखराजवळ तरी आधी पोहोचलं पाहिजे. त्यानंतरच तुलना होऊ शकते.” असं त्या म्हणाल्या. (Anuradha Paudwal)
या मुलाखतीत त्यांना लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यापैकी आवडती गायिका कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी कोणताही संभ्रम न ठेवता लता मंगेशकर यांचंच नाव घेतलं आणि त्यांच्याविषयीचा आदर पुन्हा व्यक्त केला. (Anuradha Paudwal)
अनुराधा पौडवाल यांचा संगीत प्रवास :
अनुराधा पौडवाल यांनी 1973 मध्ये आपल्या संगीत कारकिर्दीची सुरुवात केली. 1980 आणि 1990 च्या दशकात त्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली. ‘आशिकी’, ‘दिल है कि मानता नहीं’, ‘बेटा’, ‘साजन’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या गाण्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली.
त्याचबरोबर भक्ती संगीतात त्यांनी स्वतःचं वेगळं आणि अढळ स्थान निर्माण केलं. विशेषतः देवी-देवतांवरील भजने, आरत्या आणि भक्तिगीते घराघरात पोहोचली. अनुराधा पौडवाल यांनी हिंदी, मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये ९,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत.
भारतीय संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या मधुर आणि भावपूर्ण आवाजामुळे चाहते त्यांना ‘भजन क्वीन’, ‘मेलडी क्वीन’ आणि ‘भक्तीचा अमर आवाज’ अशा विशेषणांनी गौरवतात.







